जेजुरी रेल्वेस्थानक परिसरात निकृष्ट विकासकामे; रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा | पुढारी

जेजुरी रेल्वेस्थानक परिसरात निकृष्ट विकासकामे; रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक आणि तीर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या जेजुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने रस्ते व सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे सुरू करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम तातडीने थांबविण्याची मागणी माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुरू असलेले गटाराचे काम हे भुयारी व बंद पाईपलाईन टाकून करण्याची गरज असताना दोन फूट रुंद व 15 ते 20 फूट खोल चर खोदून गटाराचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्य व जीविताला धोका निर्माण झाला आहे. चर खोदून व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून उघडे गटाराचे काम त्वरित थांबवावे, भुयारी बंद पाईपलाईन टाकून हे काम करावे; अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जेजुरी रेल्वेस्थानकासमोर बुधवारी (दि. 1) बेमुदत उपोषण करणार असल्याचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, सामाजिक कार्यकर्ते संजय माने, विजय खोमणे, रोहिदास कुदळे, अलका होले यांनी सांगितले.

यासह संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे मुरुमीकरण व डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे केलेले असून, त्याची चौकशी व्हावी, रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारावा, अशा आशयाचे निवेदन पुणे विभागाचे व्यवस्थापक यांना दिले आहे. सोमवारी (दि. 30) खा. सुप्रिया सुळे यांच्या समवेत पुणे येथे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठकीचे आयोजन आहे. तेथे मागण्या मान्य न झाल्यास परिसरातील नागरिक बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबतील, असे नगरसेविका अमिना पानसरे यांनी सांगितले.

Back to top button