पुणे : केंद्राने बंदी घातलेला चित्रपट एफटीआयआयमध्ये दाखवला | पुढारी

पुणे : केंद्राने बंदी घातलेला चित्रपट एफटीआयआयमध्ये दाखवला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने बंदी घातलेला, बीबीसीने तयार केलेला गुजरात दंगलीवरील माहितीपट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेत स्टुडंट्स असोसिएशनतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दाखविण्यात आला. परवानगी न घेता स्टुडंट्स असोसिएशनकडून हा माहितीपट दाखविण्यात आला असून, या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे, त्याबाबत संपूर्ण माहिती घेतली जाईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे एफटीआयआय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तर कुणीही संगीत, माहितीपट किंवा चित्रपटावर अशाप्रकारे बंदी घालू शकत नाही. ते दाखविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, यासाठी आम्ही माहितीपटाचे स्क्रीनिंग करून माहितीपटाच्या बंदीचा निषेध केल्याचे स्टुडंट्स असोसिएशनने सांगितले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातल्यानंतर हा माहितीपट विविध संकेतस्थळांवरून हटविला.

मात्र, काही संकेतस्थळांवर तो उपलब्ध आहे. या माहितीपटाला बंदी घालण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनतर्फे 26 जानेवारी रोजी रात्री विज्डम ट्रीजवळ मोकळ्या जागेत पडद्यावर हा माहितीपट दाखविण्यात आला. या वेळी सुमारे शंभर विद्यार्थी उपस्थित होते. कोणी काय पाहावे, हा निर्णय नागरिकांवर सोडून दिला पाहिजे, इतकेच आम्हाला या सादरीकरणाद्वारे म्हणायचे आहे, अशी भूमिका स्टुडंट्स असोसिएशनतर्फे मांडली आहे. तर, परवानगी न घेता विद्यार्थ्यांनी हा माहितीपट दाखविला आहे. त्याविषयी माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे एफटीआयआय प्रशासनाने सांगितले आहे.

माहितीपट दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी घेतली नव्हती. संपूर्ण प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली जाईल आणि मग निर्णय घेण्यात येईल.

                                            – सईद रबीहाश्मी, कुलसचिव, एफटीआयआय

Back to top button