पुणे: दोन कोटींच्या खजिन्यासाठी खून, आंबी येथील आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत | पुढारी

पुणे: दोन कोटींच्या खजिन्यासाठी खून, आंबी येथील आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: दोन कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीच्या खजिन्यासाठी विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८, रा. कन्या शाळेजवळ, विजय लाॅज बिल्डिंग, आप्पा बळवंत चौक पुणे) यांची आंबी (ता. हवेली) येथील आरोपींनी पुण्यातील संतोषनगर, कात्रज येथे निघृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून तब्बल १ कोटी ८३ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने, खजिन्यासह मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. एकाच ठिकाणी आरोपींकडून मोठ्या रक्कमेचा खजिना हस्तगत करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनही थक्क झाले.

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रय निवंगुणे, नितीनचा भाऊ पांडुरंग रामभाऊ निवंगुणे व मुलगा ओंकार नितीन निवंगुणे (सर्व रा. आंबी, ता. हवेली) या चौघांना अटक केले आहे.

खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी विजय काळोखे यांचा मृतदेह आरोपींनी आडबाजूला जमिनीत खोल खड्ड्यात पुरला होता. १८ जानेवारी रोजी आंबेगाव रस्त्यावरील रानवडी (ता. वेल्हे) येथे आरोपी नितीन निवंगुणे याच्या शेतात पुरलेल्या अवस्थेत मयत विजय काळोखे याचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी खुनाचा प्रकार घडला, असे सुरुवातीला आरोपींकडून पोलीसांना सांगण्यात आले होते. तसेच सुरुवातीला नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे असे दोन आरोपी होते. पोलिसांनी खुनाचे गूढ उकलण्यास सुरुवात केली असता गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे निष्पन्न झाले. नंतर नितीन निवंगुणे याचा भाऊ व मुलगा या दोघांना पोलीसांनी अटक केले.

तपासात मयत विजय काळोखे हा घरातुन बाहेर जाताना सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा मोठा खजिना घेऊन गेला होता, अशी माहिती मयताचे नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे वेल्हे पोलीसांनी आरोपी नितीन निवंगुणे याची सखोल चौकशी केली असता विजय काळोखे हा सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम घेऊन आला होता, याची कबुली नितीन याने दिली. दागीने व रोख रक्कमेचा खजिना पाहून नितीन निवंगुणे याने पुण्यातील संतोषनगर, कात्रज येथे लोखंडी चिमट्याने डोक्यात, तोंडावर वार करून विजय काळोखे याचा खुन केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत विजय काळोखे त्याचा मृतदेह एका प्लास्टीकच्या बॅरलमध्ये टाकला. नंतर इनोव्हा कारमधुन मृतदेह टाकलेला बॅरेल रानवडी येथे आणुन विजय दत्तात्रय निवंगुणे याच्या मदतीने खड्ड्यात पुरला अशी माहिती पुढे आली आहे.

आरोपी नितीन निवंगुणे याने विजय काळोखे याचे सोन्याचांदीचे दागीने ,रोख रक्कम असा खजिना मुलगा ओंकार नितीन निवगुणे याच्याकडे ठेवला होता. त्याच्याकडून पावणेदोन किलो वजनाचे १ कोटी ५६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या विटा, दागीने तसेच १४ लाख २९ हजार ७५० रुपयांचे चांदीचे दागीने व ८ लाख रुपये किंमतीचे २८ किलो ५९५ ग्रॅम वजनाचे चांदीची भांडी, विटा व रोख रक्कम ९ लाख ११ हजार ४१५ रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार व ॲक्टीव्हा गाडी असा एकूण १ कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचा ऐवज मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तपास करत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाउसाहेब ढोले पाटील यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार व पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, सहायक फौजदार सुदाम बांदल, योगेश जाधव, हवालदार रविंद्र नागटीळक, पंकज मोघे, ज्ञानदिप धिवार, पोलिस नाईक अजयकुमार शिंदे, कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांच्या पथकाने आरोपींकडून मोठ्या रक्कमेचा खजिना हस्तगत करण्यासाठी सखोल तपास केला.

Back to top button