उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून थेट पुण्यात, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींची शक्यता | पुढारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून थेट पुण्यात, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींची शक्यता

पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे कोण उमेदवार असतील याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावे प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली असून यामध्ये मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, गणेश बिडकर, हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या पाचपैकी तीन नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असून 2 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीतून पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहे. त्यावेळी ते भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 1 किंवा 2 फेब्रुवारीला उमेदवार निश्चित होणार की आज त्याची घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button