पुणे: महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी मागितली आठ लाखांची खंडणी, महिलेसह दोघे अटकेत | पुढारी

पुणे: महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी मागितली आठ लाखांची खंडणी, महिलेसह दोघे अटकेत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पत्र्याच्या शेडवर महापालिकेची कारवाई नको असेल, तर चौघांनी 8 लाख रूपये द्या म्हणत खंडणीची मागणी करणार्‍या आणि स्वतःची ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्ष्याच्या महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष असल्याचे सांगणार्‍या महिलेससह एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली.

पुजा काळु तायड (45, रा. वृंदावन कॉलनी, आझानगर, कोथरूड) आणि निलेश शंकर वाघमारे (35, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नितीन गुलाब शिंदे (32, रा. भुजबळ टाऊनशिप निर्माण रेसिडेन्सी, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 8 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान घडला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, फिर्यादी यांचे चुलते यांची गट नंबर 69/5ब/1, शिंदे फार्म कोथरूड येथे वडीलोपार्जित चार एकर चार गुठे एवढी जमीन आहे. संशयीत आरोपी पुजा आणि निलेश यांनी आपआपसात संगनमत करून नितीन शिंदे यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या मालकीच्या दहा हजार चौर फुट जागेवर असलेले पत्राशेड अनाधिकृत असल्याबाबत त्यांनी महापालिकेत अर्ज केला होता. तो अर्ज मागे घेण्यासाठी व शेडवरील कारवाई न करण्यासाठी दोघे तिला भेटले. तसेच पुजा हीने तिची ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाची कार्यकर्ती तसेच पुणे शहर व जिल्हा महिला आघाडीची अध्यक्ष आहे अशी सांगतली. महापालिकेची शेडवर कारवाई नको असेल तर फिर्यादी आणि त्यांच्या तीन चुलत्यांना 8 लाख देण्याची मागणी केली. तसेच आठ लाख दोन दिवसात दिले नाहीत, तर येत्या चार ते पाच दिवसात कारवाई करण्यास भाग पाडेन अशी धमकी दिली. तडजोडी अंती पाच लाख रूपयांची खंडणीची मागणी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांनाही कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

Back to top button