बेल्हे : अन्न-पाण्यासाठी वन्यजीव मानवी वस्तीत

बेल्हे(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : जंगलात अन्न-पाण्याची टंचाई भासू लागताच जंगलातून सैरभैर होऊन भरकटलेले मोर आता बांगरवाडीतील मानवी वस्तीत भटकंती करून तहान-भूक भागवत आहेत. जुन्नर तालुक्याच्या आणे-माळशेजपट्ट्यात बेल्हे (बांगरवाडी) शिवारात, वन विभागाच्या असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात मोर आढळून येतात.

सह्याद्रीच्या पर्वतांची रांग आणि वनराईमुळे बांगरवाडी परिसर पर्यटकांसाठी नैसर्गिक निसर्गरम्य ठिकाण मानले जाते. बांगरवाडी शिवारातील असलेल्या वन विभागाच्या या वनराईत मोर, लांडोर, हरीण, काळवीट, ससे, तरस आदी वन्यजीव व पक्षी मोठ्या प्रमाणात असून, हे वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांसाठी वन विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून अन्न-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

परिसरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. परिसरातील असलेल्या रानावनात विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याचा फटका वन्यजिवांना बसला आहे. त्यात बांगरवाडी शिवारातील जंगलात वास्तव करणार्‍या मोर-लांडोर हे अन्न-पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. ते परिसरात असलेल्या मानवी वस्तीत भटकंती करून आपली तहानभूक भागवीत आहेत. वन विभागाच्या जंगलातून भरकटलेले 40 हून अधिक मोर-लांडोर परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या घरांचा आसरा घेऊन तहान-भूक भागवत असल्याचे गोरक्षनाथ बांगर, भागाजी बांगर या ग्रामस्थांनी सांगितले.

Exit mobile version