कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक : भाजप विरुद्ध काँग्रेस लढत रंगणार | पुढारी

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक : भाजप विरुद्ध काँग्रेस लढत रंगणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघात भाजपने पोटनिवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केला असून, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचाच उमेदवार येईल, असे बुधवारी (दि. 25) स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या दोन्ही पक्षांचे नेते काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये कसबा पेठ मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही भूमिका घेईल. पुण्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेतेही त्याला अनुकूल भूमिका घेतील, असे सध्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू आहे. ‘हाथ से हाथ जोडो’ या मोहिमेचा प्रारंभ करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी पुण्यात आले होते. त्या वेळी या दोन्ही इच्छुकांसह अन्य इच्छुक उमेदवारांशी तसेच स्थानिक नेत्यांशी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. कसबा पेठ मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती. त्यापूर्वीच्या दोन निवडणुकांत धंगेकर मनसेतर्फे लढले होते. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत धंगेकर काँग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रभागाचा मोठा भाग या मतदारसंघात समाविष्ट आहे. या दोन्हीही इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीची आखणी केली. त्यांनी तीन समित्या नियुक्त करीत त्यामध्ये स्थानिक नेत्यांना समाविष्ट केले. त्यांना निवडणुकीसंदर्भात तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी होत असून, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा मुलगा कुणाल यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकेल. त्यांच्याऐवजी अन्य उमेदवाराची निवड करण्याचे ठरल्यास, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी नगरसेवक राजेश येनपुरे या इच्छुकांतून एकाची निवड पक्षातर्फे होऊ शकेल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की पक्षाच्या प्रदेश समितीकडून तीन नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली जातील. त्यांच्यामधून एकाची निवड केली जाईल.’ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 31 जानेवारी ते सात फेब्रुवारीदरम्यान दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदान पूर्वी जाहीर केलेल्या 27 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारी रोजी होईल, असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले आहे.

Back to top button