पुणे : साडेतीन हजार बालके दगावली; 1 वर्षाच्या आतील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक | पुढारी

पुणे : साडेतीन हजार बालके दगावली; 1 वर्षाच्या आतील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जंतुसंसर्ग, जन्मत: असणारे दोष, कमी वजन, नियमित लसीकरणाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये 0 ते 1 वर्ष (इन्फंट डेथ) या वयोटातील 3,471 बालकांचा मृत्यू झाला. यामध्ये 1,900 मुले आणि 1,571 मुलींचा समावेश आहे. याशिवाय, पाच वर्षांत 2,734 मृत बालके (स्टिल बर्थ) जन्माला आल्याचे निदर्शनास आले आहे. गर्भवती स्त्रीने स्वत:चे आणि बाळाचे पोषण व्यवस्थित होईल, याची काळजी घ्यावी, नवजात बालकांना सात आजारांविरुद्ध देण्याच्या लसी चुकवू नयेत, दोन प्रसूतींमध्ये पुरेसे अंतर असावे, मातेचे आणि बाळाचे आरोग्य जपले जावे, घरी प्रसूती करू नये, गर्भधारणेआधी, दरम्यान आणि प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास बालमृत्यू रोखता येऊ शकतात, असे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी अर्थात 2022 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षी 0 ते 1 वयोगटातील 303 बालकांच्या मृत्यूचे निदान झाले. तर, 545 मृत बालके जन्माला आली. 1 ते 5 वर्षे वयोगटातील 137 बालकांचा मृत्यू झाला आहे.

काय आहेत कारणे?

 • आईचे पोषण कमी झाल्यामुळे नवजात अर्भकांचे कमी वजन
 • जंतू किंवा अन्य प्रकारचा संसर्ग
 • कमी वजन
 • अपुर्‍या दिवसांची मुले
 • श्वसनमार्गाचे आजार, अतिसार
 • शारीरिक संस्था अपरिपक्व असणे
 • जन्मत: दुखापत
 • लसीकरणाचा अभाव
 • आई व बाळ कुपोषित असणे
 • आईला संसर्ग होणे आणि चुकीच्या समजुती
 • घरगुती प्रसूती
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरगुती केले जाणारे उपचार

प्रतिकारशक्ती कमी असल्याने नवजात अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असते. बाळांमधील बहुतांश संसर्गजन्य आजार लसीकरणाने रोखता येतात. बाळ जन्माला आल्यावर पहिल्या वर्षभरात केले जाणारे लसीकरण बाळाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. लसीकरण योग्य पद्धतीने न झाल्यास बालमृत्यूचे प्रमाण वाढते. कुपोषणामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढते. किशोरावस्थेत मुलीचे योग्य पोषण झाल्यास निरोगी आई होऊ शकेल आणि पर्यायाने सुदृढ बाळ जन्माला येऊ शकेल.

                                                            – डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ

वर्ष        0 ते 1 वर्ष    1 ते 5 वर्षे    मृत बालके
2022       303            137            545
2021      843             161            386
2020      428              84             418
2019      717             34              506
2018     180            345             879

Back to top button