आळेफाटा : पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून | पुढारी

आळेफाटा : पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून

आळेफाटा(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात ५०० रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या वादात टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मंगळवारी (दि. २४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने स्वतःवरही वार करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे. विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय-४२ रा. पिंपळवंडी ) असे खुन झालेल्या टुरिस्ट व्यावसायकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी (रा. राजुरी) असे खुन केलेल्या गॅरेज कामगार आरोपीचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात सचिन भिमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी (एमएच १४ डीटी ५३०८) एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरस्ती बिलाच्या ७ हजार ६०० पैकी ७ हजार १०० रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला ५०० रुपये देणे बाकी होते. उर्वरित ५०० रुपयासाठी मयुरने गोडसेकडे फोनवर सारखा तगादा लावला होता.

मंगळवार सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ करत गॅरेजवर ये तुला बघून घेतो अशी धमकी दिली. संतोष आळेफाटा चौकातून लगेच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वार केले. आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.

त्यानंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात भादवि कलम ३०२, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.

पोलीस बंदोबस्तात आरोपीवर उपचार सुरु

टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याचा खून केल्यानंतर आरोपी गॅरेज कामगार मयूर सोमवंशी याने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.

Back to top button