पुणे : केळी फेकून दिल्याच्या किरकोळ कारणावरून खून; न्यायालयाने सुनावली जन्मठेप | पुढारी

पुणे : केळी फेकून दिल्याच्या किरकोळ कारणावरून खून; न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केळी फेकून दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात वीट मारून खून केल्याप्रकरणी सुभाष धर्मा पवार (वय 49, रा. थेरगाव) यास न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ही घटना 28 सप्टेंबर 2017 रोजी थेरगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली.

या प्रकरणी, सुभाष वाघमारे यांचा मुलगा किशोर याने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. मयत वाघमारे, त्यांचे मित्र बाळू अडागळे आणि आरोपी पवार बोलत होते. त्या वेळी अडागळे याने आईसाठी आणलेली केळी वाघमारे यांनी फेकून दिली, त्यामुळे वाघमारे आणि अडागळे यांच्यात वाद झाला. यामध्ये किरकोळ मार लागल्याने अडागळे निघून गेला. त्यानंतर पवार याने अडागळेची केळी का फेकून दिली म्हणत वीट डोक्यात घालून वाघमारे यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. नामदेव तरळगट्टी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाचा निकाल दिला. सहायक पोलिस निरीक्षक टी. एस. भोगम यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी डी. एस. पांडुळे आणि पोलिस नाईक अरुण कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

Back to top button