पुणे: मुलांना मारहाण करणारा उप प्राचार्य निलंबित, शिपाई कायमस्वरूपी घरी; आळेफाटा येथील ज्ञानमंदिरातील प्रकरण | पुढारी

पुणे: मुलांना मारहाण करणारा उप प्राचार्य निलंबित, शिपाई कायमस्वरूपी घरी; आळेफाटा येथील ज्ञानमंदिरातील प्रकरण

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षक आणि सहकारी शिपायाकडून अमानुषपणे मारहाणप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी उपप्राचार्य आणि शिपाई यांच्याविरोधात शनिवारी (दि. २१) रात्री गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर उप प्राचार्य जयसिंग जाधव यांना दोन महिन्यांसाठी निलंबित, तर तात्पुरता सेवेत असलेला शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे याला कायमस्वरूपी कामावरून कमी केल्याचे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्याने शिक्षकांवर शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून अकरावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने शिपायाच्या मदतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी (दि. २०) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना चांगलाच संताप झाला. या प्रकरणाचे पडसाद स्थानिक तसेच राज्यभर उमटल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी उपप्राचार्य आणि शिपाईविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला होता. पालकांनी लवकरात लवकर कारवाई करीत शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे यांनी मंगळवारी (दि. २३) संचालक मंडळाची बैठक घेऊन कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही कारणांमुळे मंगळवारी संचालक मंडळाची बैठक झाली नाही.

याबाबत अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की, उपप्राचार्य जयसिंग जाधव यांना दोन महिन्यांसाठी निलंबित केले असून, कठोर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कायदेशीर सल्ला घेतला जाईल. शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे संस्थेकडे तात्पुरत्या सवेत होता. त्याला कायमस्वरूपी कामावरून कमी केले आहे. लवकरच संचालक मंडळाची बैठक घेत पुढील निर्णय आपणास कळवू, असे देखील त्यांनी सांगितले.

Back to top button