इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट | पुढारी

इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट

बावडा; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दशकांपासून वाढत्या ऊसक्षेत्रामुळे रब्बी ज्वारी पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. परिणामी, चालू रब्बी हंगामात ज्वारीचे पीक अगदी तुरळक ठिकाणीच दिसत आहे. इंदापूर तालुका स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळातही रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जात होता. संपूर्ण तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक प्रामुख्याने घेतले जात होते. ‘ज्वारीचे खळे’ हा त्या काळी प्रसिद्ध शब्द होता.

ज्वारी पिकामुळे व शेतकर्‍यांकडे असलेल्या बैलांमुळे व खिलार गायींमुळे कडब्याच्या गंजी जागोजागी दिसून येत होत्या. त्यानंतर साखर कारखानदारी उभी राहिली व सिंचनाच्या सुविधा वाढल्याने ऊस पिकाखालील क्षेत्र वाढत गेले. दुसर्‍या बाजूला ज्वारी पिकाखालील क्षेत्र कमालीचे घटले. यंदा मकर संक्रांतीला ज्वारीचे कणीस हे चक्क वीस-पंचवीस रुपयांना विकले गेले.

इंदापूर तालुक्यात गेल्या दशकापर्यंत सराफवाडी, निरवांगी, बोराटवाडी, खोरोची, पिटकेश्वर, चाकाटी, रेडा, रेडणी, काटी हा भाग ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता ऊस पिकाखालील क्षेत्र एवढे वाढले आहे, की इंदापूर तालुका हा उसाचे आगार म्हणून राज्यामध्ये ओळखला जात आहे, अशी माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महावीर गांधी व राहुल कांबळे (खोरोची) यांनी दिली.

ज्वारीच्या मालदांडी (एम-35-1) या वाणास गेल्या अनेक दशकांपासून शेतकर्‍यांची पसंती होती. ज्वारीची पेरणी धान्य उत्पादनाबरोबरच जनावरांना वर्षभर कडबा उपलब्ध व्हावा म्हणून केली जात असे. आता वाढता उत्पादन खर्च व मजुरांची टंचाई, यामुळे ज्वारी पिकापासून फारसा आर्थिक फायदा होत नसल्याने शेतकरी ऊस तसेच फळबागांकडे वळला आहे, असे भारत लाळगे (सराफवाडी), अमरदीप काळकुटे (रेडणी), प्रसाद देवकर (रेडा) यांनी दिली.

यंदाच्या रब्बी हंगामात अनेक गावांत ज्वारीचे क्षेत्र गायब झाले आहे. परिणामी, जनावरांना कडब्याची टंचाई आगामी काळात भासणार आहे. राज्यात देखील ज्वारी पिकावरील क्षेत्र घटल्याने नागरिकांना ज्वारी महागड्या भावाने घ्यावी लागणार आहे. पूर्वी ज्वारी स्वस्त होती व गहू महाग होता. आता उलट स्थिती झाली आहे. एकंदरीत, गरिबांची भाकरी महागली आहे.

Back to top button