पुणे : कितीही टीका करा,दाओसला प्रचंड प्रतिसाद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर | पुढारी

पुणे : कितीही टीका करा,दाओसला प्रचंड प्रतिसाद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘कोणी कितीही टीका केली, आरोप-प्रत्यारोप केले, तरी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास दाओस येथे चांगला प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार (एमओयू) झाले आहेत. तसेच, येणार्‍या काळात तुम्हाला त्याची खात्री पटेल. विरोधकांना आरोप आणि टीका करण्यापलीकडे दुसरं काही काम आहे का? त्यांना टीका करू दे, आम्ही कामातून उत्तर देऊ,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे स्पष्ट केले.

मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शनिवारी (दि.21) झालेल्या वार्षिक सभेनंतर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘दाओसमध्ये आपल्या देशाप्रती विश्वास पाहायला मिळाला असून, महाराष्ट्रात उद्योग आल्यानंतर त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा, सवलती मिळतील, असा विश्वास आम्ही दिला आहे. गुंतवणुकीबाबत करार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

काहींचे करार राहिले आहेत, तेही राज्यात येणार आहेत. काही देशांच्या प्रमुख गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मकता दर्शविली. मागे काय झाले, कोणाबरोबर एमओयू केले, त्यांची उलाढाल काय होती, ताळेबंद काय होता, यामध्ये मला जायचे नाही. राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे करार, एमओयू झाले आहेत. येणार्‍या काळामध्ये ते सर्व दिसून येईल,’ असे त्यांनी सांगितले.

अडचणीच्या वेळी शरद पवार यांचा सल्ला घेतो
राज्याच्या भल्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मदत करतात, असे नमूद करून व्हीएसआयच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की अडचणीची वेळ येते, तेव्हा शरद पवार यांच्याकडून सल्ला घेतो. सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘शरद पवार हे देशाचे आणि राज्याचे अनुभवी नेते आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक बदल घडवले असून, त्यांच्यामुळे एक वेगळी उंची लाभली आहे.’ जे सत्य आहे तेच मी बोललो, असेही ते म्हणाले.

Back to top button