कसबा, चिंचवडसाठी उडणार राजकीय धुरळा; पोटनिवडणूक बिनविरोधचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन अजित पवारांनी धुडकावले | पुढारी

कसबा, चिंचवडसाठी उडणार राजकीय धुरळा; पोटनिवडणूक बिनविरोधचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन अजित पवारांनी धुडकावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज धुडकावून लावले. या दोन्ही जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीची मुंबईत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असून ज्याची ताकद अधिक त्याला उमेदवारी या सूत्रानुसार चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार राजकीय धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या नातलगांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मुंबईत नुकतेच केले होते. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी प्रथा आपल्याकडे चालत आली असून, मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपने आणि आम्हीही उमेदवार मागे घेतला.

त्यामुळे विरोधी पक्षांनी ही पोटनिवडणूकही बिनविरोध करण्याबाबत विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते. अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे आवाहन फेटाळून लावले. ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. आत्ताची स्थिती पाहता या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होतील याबद्दल मला साशंकताच वाटते, असेही ते म्हणाले. चिंचवडमधील जागेबाबत शंकर जगताप किंवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीचे नाव पक्षाकडे कळविल्याचे समजते.

तसेच कसबा विधानसभेसाठी भाजपचे गणेश बीडकर व काही नावं पुढं येताहेत. तसेच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीसुध्दा इच्छुक आहेत असे बोलले जाते. अर्थात कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न असून त्यामध्ये नाक खुपसण्याची गरजच नाही. मात्र, दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

’दाओस’मधील गुंतवणूकदार राज्यातीलच?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओसमधील गुंतवणुकीवर भाष्य केल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, व्यासपीठावर आम्ही दोघे शेजारी बसून बोलत होतो. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात येऊन काही उद्योगपती गुंतवणूक करू पाहताहेत असं ते म्हणाले. पण, ते कोण आहेत हे कळेलच. मात्र, आत्ताच्या घडीला ज्यांचे युनिट महाराष्ट्रात आहेत, अशाच लोकांनी करार केले आहेत, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

बारामतीमधील कामाबाबत विरोधक कौतुकच करतात-
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात पवार कुटुंबीयांची स्तुती केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, आमच्यावर कोणी काहीही आरोप करावेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहू द्या. मात्र, बारामतीमधील पाच दिवसांचं कृषी प्रदर्शन हे शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार आहे. कृषिमंत्री सत्तार यांनी पाहणी केल्यानंतर वक्तव्य केले.

आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जीव ओतून काम करतो. त्यामुळं आमचं हे काम पाहून विरोधक कौतुकच करणार. राज्य सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याबद्दल छेडले असता अजित पवार म्हणाले, एखाद्या बँकेत घोटाळा झाला असता तर ती बँक रसातळाला गेली असती. आता गतवर्षी राज्य बँकेस 650 कोटींचा नफा झाला आहे, याचा अभ्यास करावा.

सध्या धर्माधर्मात मोर्चे निघत असून त्यांच्यामधील अंतर वाढत जाते. आपल्याकडे सर्वधर्मसमभाव या पुरोगामी विचाराला तिलांजली देण्याचे प्रकार होत आहेत. आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा, परंतु अतिरेक करू नये. सर्वांनी सामंजस्य भूमिका घ्यायला हवी. सध्याची वाढत चाललेली प्रचंड महागाई, वाढलेली बेरोजगारी आणि 8 दिवसांतच जी-20 च्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांनी मंदीबाबत केलेले सूतोवाच यामुळे समस्या निर्माण होणार आहेत.

केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मंदीचे वक्तव्य केले आहे. आयटी क्षेत्रातही नोकर्‍यात स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावत आहेत. लोकांच्या मनात रोष निर्माण होईल आणि देशातील सत्ता सोडावी लागेल. म्हणून जातीय दरी निर्माण झाली तरी सत्तेवर आलो पाहिजे, असा प्रयत्न दुर्दैवाने कोणी करीत असेल, सत्ता मिळविणे हेच ध्येय ठेवून कोणी काम करीत असेल तर लोकशाहीची थट्टा आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असा विचार कधीच केला नसता, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

कोयता गँगची दहशत मोडून काढायला हवी
शहरातील कोयता गँगची दहशत अद्याप सुरू असल्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, ती दहशत मोडून काढायला हवी, त्यांना ठेचून काढायला हवे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई व्हायला हवी. विरोधक म्हणून आमचे कारवाईस सहकार्य राहील. त्यांना मोक्का लावून जेरबंद केले पाहिजे. मुंबईत हा विषय मी देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा करणार आहे. माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, यामध्ये दुमत नाही. मात्र, कायद्याचा वेगळा अर्थ काढून उद्योगास त्यांच्याकडून काही समस्या निर्माण करून गैरफायदा घेत असतील ते थांबविले गेले पाहिजे.

Back to top button