पुण्यातील कसबा पेठ अन् चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध का? अजित पवारांचं मोठं वक्तव्य | पुढारी

पुण्यातील कसबा पेठ अन् चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध का? अजित पवारांचं मोठं वक्तव्य

पुणे, पुढारीऑनलाईन: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल या बाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. महाविकास आघाडी सोमवार-मंगळवार मुंबईत एकत्र बसून चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दोन्ही मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून शंकर जगताप किंवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव सुचवले आहे. तसेच कसबा पेठ विधानसभासाठी भाजपची अनेक नावं पुढे येत आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेईल. आम्ही त्यात लुडबुड करायची गरज नाही. परंतु, दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळच या पोटनिवडणूका बिनविरोध होईल का? याबाबत मला शंका आहे, असं अजित पवार म्हणाले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचीपोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज ते हा प्रस्ताव शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहेत. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मान्य केला तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. यामध्ये ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.

सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये काही नवीन प्रश्न उभे राहतील, अशी वक्तव्य मी करणार नाही. काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांच्याबाबत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बोलले आहेत. काँग्रेसमध्ये जे घडलं ते पुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

 

 

Back to top button