विद्यार्थ्यांचे केस पकडून शिक्षकांची लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलांकडून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल | पुढारी

विद्यार्थ्यांचे केस पकडून शिक्षकांची लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलांकडून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

आळेफाटा : शिक्षकांनी आकरावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना चांगलाच संताप झाला आहे. ही घटना २१ जानेवारीला घडल्याची माहिती आहे. ज्ञानमंदिर जुनियर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला. एका विद्यार्थ्यांने शिक्षकांना शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीशी शहानिशा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा मारल्याचा आरोप आहे. माझी चुक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी एका विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले.

ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली आहे. बैठक सुरु असल्याने विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थीसह पालकांकडून विद्यालया विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button