बारामती : अनधिकृत वीटभट्टी चालकांवर गुन्हा | पुढारी

बारामती : अनधिकृत वीटभट्टी चालकांवर गुन्हा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : अनधिकृतपणे वीटभट्ट्या सुरू ठेवणार्‍या पवईमाळ (ता. बारामती) येथील तिघांवर माळेगाव बुद्रूक पोलिसांनी खाण व खनिज अधिनियमासह पर्यावरण संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला.
रामचंद्र यशवंत कुंभार, धनंजय विठ्ठल कुंभार व नितीन विठ्ठल कुंभार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पणदरे येथील गावकामगार तलाठी भरत संजय वाव्हळ यांनी फिर्याद दिली.

पवईमाळ येथे लोकवस्तीमध्ये कुंभार हे अनधिकृत वीटभट्टी चालवत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार प्रांत व तहसील कार्यालयाने कुंभार यांना वीटभट्टी बंद करण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यानंतरही वीटभट्टी चालू ठेवण्यात आली. परिणामी, तहसीलदारांनी गावकामगार तलाठी यांना घटनास्थळाची पाहणी करत कारवाईचे आदेश दिले.

मंडल अधिकारी रवींद्र पारधी, कोतवाल पांचाली जगताप यांच्यासह घटनास्थळी जात फिर्यादीने पंचनामा केला. रामचंद्र कुंभार यांच्या गट क्रमांक 339 -1मधील वीटभट्टीजवळ 80 हजारांची अंदाजे 100 ब—ास माती, एक लाख रुपयांच्या 20 हजार कच्च्या विटा, प्रत्येकी दोन लाख किमतीचे दोन ट्रॅक्टर मिळून आले. धनंजय व नितीन हे वीटभट्टी चालवत असल्याचे दिसून आले. तेथे 1 लाख 60 हजार रुपयांची 200 ब्रास माती, 1 लाख रुपयांच्या 20 हजार कच्च्या विटा, दोन लाख रुपयांचा एक ट्रॅक्टर व प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीच्या दोन ट्रॉल्या आढळून आल्या.

गट क्रमांक 314 मध्ये रामचंद्र कुंभार चालवत असलेल्या वीटभट्टीच्या ठिकाणी 2 लाख 80 हजार रुपयांची 350 ब्रास माती, 3 लाख रुपयांच्या 60 हजार कच्च्या विटा, 2 लाख रुपयांचा एक ट्रॅक्टर, 3 लाख किमतीचा जेसीबी व प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचे दोन ट्रेलर आढळून आले. या वीटभट्टी चालकांनी कोणतेही परवाने घेतले नव्हते. विटा तयार करण्यासाठी लागणारी माती बेकायदा साठवून ठेवत गौण खनिज अधिनियमांचे उल्लंघन केले. तसेच प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास हानी पोहोचेल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button