पुण्यात पहाटेचा थरार, दुकान फोडून लाखभर रुपयांचे कपडे पोत्यात भरले, पळून जाणार तोच … | पुढारी

पुण्यात पहाटेचा थरार, दुकान फोडून लाखभर रुपयांचे कपडे पोत्यात भरले, पळून जाणार तोच ...

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात चोरीच्या घटना वाढत असताना हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांनी एका चोरट्याला मुद्देमाल चोरून पळून जात असताना पाठलाग करून पकडले. पहाटे दीडच्या सुमारास हडपसर येथील रस्त्यावर हा थरार घडला. यावेळी नेत असलेली 1 लाख 20 हजारांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. गणेश गौतम कोरडे (22, रा.15 नंबर चौक, हडपसर) याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून साहिल कचरावत (रा. सातवनगर, हडपसर, पुणे) आणि त्यांच्या अन्य एका साथीदारावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात अविष्कार नावाच्या इमारतीत मेन मुमेंट नावाचे कपड्याचे दुकान आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात काही तरी संशयीत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. याबाबत हडपसर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे मार्शल रशीद शेख आणि लखन दांडगे यांनी मंत्री मार्केटकडे त्यांच्या दुचाकीवरून धाव घेतली. यावेळी गणेश कोरडे आणि त्याचे दोन साथीदार दुकान फोडून त्यातील कपडे चोरी करून जात दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.

मार्शलने त्यांच्याकडील दुचाकी या तिघांच्या दुचाकीसमोर जाऊन आडवी लावली. यावेळी आरोपींचा गडबडीत दुचाकीवरचा ताबा सुटुन तिघे खाली पडले. त्यांनी पोत्यात भरून चालवलेली कपडेही रस्त्यावर पडली. पोलिसांना पाहून दोघांनी घटनास्थळावरून धुम ठोकली. परंतु, गणेश कोरडे दोन्ही मार्शलच्या हाती लागला. त्याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच त्याचा फरार झालेला साथीदार साहिल कचरावत याच्यावरही यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र गस्तीवर असलेले मार्शल शेख आणि दांडगे यांनी ही कामगिरी केली. यापूर्वी आरोपीने अशा चोर्‍या केल्या आहेत का ? याचाही तपास सुरू आहे.

गुरूवारी रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी हडपसर पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून संशयास्पद हालचाली विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन मार्शलनी घटनास्थळी धाव घेऊन चोरी करून दुचाकीवर पळून जाणार्‍या चोरट्याला पाठलाग करून पकडले. यावेळी चोरट्याने चोरलेली 1 लाख 20 हजारांची कपडे जप्त करण्यात आली आहे.
– अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

 

Back to top button