पुरंदर तालुका क्रीडा संकुलासाठी 11 कोटी मंजूर; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती | पुढारी

पुरंदर तालुका क्रीडा संकुलासाठी 11 कोटी मंजूर; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

सासवड; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुका क्रीडा संकुलासाठी 11 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे भव्य-दिव्य क्रीडा संकुल निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील दिवे (ता. पुरंदर) येथे माजी मंत्री शिवतारे यांच्या प्रयत्नातून तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले होते.
शिवतारे म्हणाले, या संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

राज्य क्रीडा विकास समितीने मागील काळात किमतीमध्ये झालेली वाढ आणि संकुलातील वाढीव कामे यासाठी नवीन अंदाजपत्रकांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला राज्य शासनाच्या धोरणानुसार या संकुलाला 1 कोटी रुपये मिळाले होते. शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सरंक्षण भिंतीसाठी अतिरिक्त 76 लाख रुपयांचा निधी मिळवला होता. 29 मार्च 2022 रोजी या संकुलाला 5 कोटी 58 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.

दरम्यान, या क्रीडा संकुलाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महामार्ग असे अनेक प्रकल्प होत असल्याने क्रीडा संकुलदेखील भव्य-दिव्य असावे, अशी विनंती नागपूर अधिवेशन काळात शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांना प्रत्यक्ष भेटून शिवतारे यांनी केली होती. त्यानुसार आता क्रीडा विभागाने या संकुलासाठी 11 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

शिवतारे म्हणाले, क्रीडा संकुलाचे काम हे पुरंदरच्या वैभवात भर घालणारे आहे. तालुक्यातील युवकांना याचा मोठा फायदा होणार असून, इथे उच्च प्रतीच्या सोयी-सुविधा मिळाव्यात या दृष्टीने भविष्यात प्रयत्न केले जातील. नियोजन समितीतून जास्तीत जास्त निधी आणणार जिल्हा नियोजन समितीत नियोजनाचा अनुभव असलेले तज्ज्ञ सदस्य म्हणून झालेल्या नेमणुकीबाबत शिवतारे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मागील काही वर्षात जिल्हा नियोजन समितीचा सर्वाधिक निधी केवळ एकाच तालुक्याने लुटला. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, पुरंदर, इंदापूर, भोर आणि खडकवासला या तालुक्यांसह इतर सर्वांनाच समन्यायी निधीवाटप व्हावे, असा माझा कायम आग्रह असेल,’ असे शिवतारे म्हणाले.

Back to top button