पर्वतीदर्शनमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैना | पुढारी

पर्वतीदर्शनमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैना

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कुठे नळ तुटलेले, तर कुठे पाणीच नाही, कित्येक दिवस स्वच्छता न केल्याने सर्वत्र पसरलेली घाण, त्यामुळे पसरलेली दुर्गंधी टाळण्यासाठी नाकाला रुमाल लावून मार्गस्थ होणारे नागरिक हे विदारक चित्र आहे, पर्वतीदर्शन परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे. पर्वतीदर्शन हा परिसर पुणे महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येतो. येथे असलेली बहुतांश स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विशेषत: साफसफाईची जबाबदारी प्रशासनाने खासगी ठेकेदारांकडे सोपवलेली आहे.

मात्र, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि पालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक हेही कामगारांची कामे तपासण्यात कमी पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे या परिसरात शौचालयाच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांना, दुकानदारांना, महिलांना, लहान बालकांना, व्यापार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नादुरूस्त शौचालयामुळे नागरिकांची, महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

पर्वतीदर्शन विभागातील पाच ते सहा ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांबाबत आरोग्य कोटीवर मुकादम व आरोग्य निरीक्षक यांना वेळोवेळी तक्रारी व माहिती दिली असता अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त आशिष महादळकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत अगोदर माहिती घेतो, त्यानंतर काय कारवाई करणार याबाबत लवकरच सांगतो, असे मोघम उत्तर दिले.

पर्वतीदर्शन विभागातील सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी खासगी ठेकेदाराला काम दिले आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने सध्या महापालिकेचे कर्मचारी काम करतात, तसेच या ठिकाणची शौचालयाची दुरवस्था, तुटलेले दरवाजे, भांडे याबाबत आम्ही महापालिका वरिष्ठांना लेखीपत्र दिले आहे. पुढील काही दिवसांत या ठिकाणची डागडुजी व दुरुस्ती केली जाणार आहे.
                                                                  अशोक बंडगर,
         वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका, पुणे.

पर्वतीदर्शन भागातील आमच्या घराजवळील व मंडळाच्या शेजारील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची मोठी दुरवस्था झालेली आहे. आम्ही बर्‍याच वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, ना पालिकेकडून त्याची दखल घेतली गेली ना ठेकेदाराची सफाई कामगारांनी येथील स्वच्छतागृहांची सफाई केली. आठवड्यातून एकवेळा शौचालय धुण्यासाठी येतात फक्त पाणी मारून निघून जातात, जर याबाबत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष आणून बसवावे लागणार आहे.
                                        विकास चोपदार, स्थानिक रहिवासी, पर्वतीदर्शन.

Back to top button