कोंढवा : ऑलिम्पिक पदक हे माझे लक्ष्य; शिवराज राक्षे यांचा संकल्प | पुढारी

कोंढवा : ऑलिम्पिक पदक हे माझे लक्ष्य; शिवराज राक्षे यांचा संकल्प

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : ‘महाराष्ट्र केसरीविजेता ठरल्यानंतर आता अधिक जबाबदारी वाढली असून, भरपूर सराव करून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, तर पदक मिळवून महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे,’ असा संकल्प महाराष्ट्र केसरीविजेता शिवराज राक्षे याने व्यक्त केला आहे.

महंमदवाडी येथे बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना एक लाख रुपयांचा धनादेश देत सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र केसरीविजेता राक्षे याने आपली भावना व्यक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, जय महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना जिल्हाप्रमुख नीलेश माझिरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, संतोष भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, अभिजित बाबर, कपिल काळे, बबलू पटेल, अमित दाभाडे आदी उपस्थित होते.

मातीतले खेळ करिअर होताहेत : भानगिरे
शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे म्हणाले की, क्रीडाक्षेत्रात नवनवीन खेळ विकसित होत आहेत. मात्र, मातीतल्या खेळाकडे ’करिअर’ म्हणून बघण्याची वृत्तीही सर्वत्र विकसित होताना दिसत आहे. खेळात ’करिअर’ करण्यासाठी आज अनेक होतकरू खेळाडू तयार झालेले आहेत. आज महाराष्ट्र केसरीच्या रूपाने पैलवान शिवराज राक्षे याला राष्ट्रीय स्तरावरील खेळ खुणावत आहेत. त्याला शासकीय सेवेत समावेश तसेच पुढील सरावासाठी काही आर्थिक साहाय्य सरकारस्तरावर देता येईल का? अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत.

Back to top button