पुणे : भाजप ब्राह्मण उमेदवाराची परंपरा राखणार? कोणाला मिळणार संधी.. | पुढारी

पुणे : भाजप ब्राह्मण उमेदवाराची परंपरा राखणार? कोणाला मिळणार संधी..

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघात भाजप गेली पाच दशके ब्राह्मण समाजाला उमेदवारी देत असून, यावेळी पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा याच समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणार, की अन्य समाजाच्या कार्यकर्त्याला संधी देणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि शिवसेनाही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी केली. या जागेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्याचे ठरल्यास, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा मुलगा कुणाल यांना उमेदवारी मिळू शकते. महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे यांची नावेही चर्चेत आहेत. या मतदारसंघातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले विद्यमान खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांनाही संधी मिळू शकते. भाजपला या अनेक इच्छुकांतून एकाची निवड करावी लागणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या माजी नगरसेवकांपैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. धंगेकर यांनी दोनवेळा बापट यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली. गेल्या निवडणुकीत शिंदे हे टिळक यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार होते. शिवसेनेकडून शहरप्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक विशाल धनावडे, शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या वेळी धनावडे यांनी निवडणूक लढविली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील याही इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. कसबा पेठ मतदारसंघात जुन्या पुण्याचा मुख्यत्वे पेठांचा भाग समाविष्ट आहे. येथे ब्राह्मण आणि मराठा समाजाचे मतदार अधिक संख्येने असले, तरी बारा बलुतेदार यांचीही वस्ती या भागात आहे. तसेच, काही भागांत मुस्लीम समाज तसेच व्यापारी वर्गाचीही वस्ती आहे.

भाजपचे रामभाऊ म्हाळगी, अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. काँग्रेसकडून उल्हास काळोखे 1985 मध्ये निवडून आले होते. तर, अण्णा जोशी खासदार झाल्यानंतर, 1992 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव थोरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. 1972 पासून आतापर्यंत झालेल्या बारा निवडणुकीत जनसंघ, जनता पक्ष व भाजप यांनी दहावेळा कसबा पेठेतील निवडणूक जिंकली. मात्र, मतदारसंघाचा विस्तार झाल्यानंतर, विरोधकांतील मतविभागणीचाही भाजपला फायदा झाला. यावेळी भाजप व महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

ब्राह्मण समाजाच्या मतदारांपैकी बहुसंख्य मतदार पूर्वापार भाजपच्या पाठिशी आहे. त्यातच त्यांच्यासाठी मतदारसंघांची संख्या तुलनेने राज्यात कमी आहे. त्यामुळे भाजपतर्फे कसबापेठ मतदारसंघातून या समाजाला उमेदवारी दिली जाते. या वेळी ती परंपरा पाळणार की खंडित होणार, हा चर्चेचा विषय आहे. भाजपकडून कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी शहरातील भाजपचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघात तळ ठोकून बसतील व भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

Back to top button