पुणेः पोलिसांचे प्रसंगावधान, तरुणाच्या खूनाचा कट उधळला; कुर्‍हाड,कोयता,तलवार, गुप्ती अशी घातक हत्यारे जप्त | पुढारी

पुणेः पोलिसांचे प्रसंगावधान, तरुणाच्या खूनाचा कट उधळला; कुर्‍हाड,कोयता,तलवार, गुप्ती अशी घातक हत्यारे जप्त

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  दोन गटात झालेल्या वादात मध्यस्थी करणार्‍या तरुणाच्या तरुणाच्या खूनाचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक करून, त्यांच्या तिघा अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. सलमान खान (रा. मोमीनपुरा) असे खूनाचा कट रचण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

समीर सलीम शेख (वय.19), शाहीद फरीद शेख (वय.26,राहणार दोघे कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कुर्‍हाड,कोयता,दोन गुप्त्या, एक तलवार असा दोन हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात शहरात घडलेल्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणातून, वर्चस्ववाद, नजरेला नजर भिडतात ही मुळे एकमेकांवर सशस्त्र हल्ला करत असल्याचे दिसून येते आहे. हा देखील असाच प्रकार आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपी असलेल्या एका मुलाची दुसर्‍या गटातील मुलांसोबत वाद झाला होता. त्यावेळी सलमान याने मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता. परत त्या मुलाने आणखी एका गटासोबत वाद केला. त्यावेळी त्याने सलमान हा आपला भाऊ असून, आपल्याला कोणी नडायचे नाही असा दम भरला. दरम्यान हा प्रकार सलमान याच्या कानी पडला. त्याने त्या मुलाला चांगलेच सुनावले. तसेच त्याने पुन्हा असे केले तर त्याला पाहून घेईल असे म्हटले. त्याचाच राग या मुलाला आला. त्याने समीर,शाहीद आणि आपल्या इतर दोघे अल्पवयीन साथीदार असे मिळून सलमान याच्या खूनाचा कट रचला.

दुसरीकडे पोलिस कर्मचारी अनिकेत बाबार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, दोन गटात झालेल्या वादाच्या कारणातून काही तरुण सलमान याच्या खूनाच्या तयारीत आहेत. त्यांनी हा प्रकार तत्काळ वरिष्ठांच्या कानावर घातला. संशयित आरोपींची माहिती घेत असताना, सर्वजन कोंढवा येथील एका पत्राच्या शेडमध्ये थांबणार असल्याचे कळाले. त्यानुसार पथकाने आरोपींना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी, कर्मचारी अनिकेत बाबर, अभिनव लडकत, इम्रान शेख, तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने केली.

आरोपींची धिंड..

दोघा आरोपीना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची धिंड काढली. ज्या परिसरात ते गुन्हा करण्यासाठी एकत्र जमले होते. तेथून पोलिसांनी त्यांना रस्त्याने फिरवले.

मार्शलने हटकले अन् प्लॅन फिसकटला

सलमान याचे दुकान असून, तो व्यवसाय करतो. यापुर्वी देखील आरोपींनी स्वारगेट येथील एका मॉलपरिसरात त्याच्या खूनाचा प्लॅन आखला होता. त्याला तेथे बोलावून सुद्धा घेतले होते. मात्र गस्तीवरील मार्शल पोलिस तेथे आले. मुले थाबलेली पाहून त्यांना संशय आला. त्यांनी त्यांना येथे काय करता असे म्हणून दम दिला. त्यामुळे तेथून ते पळून गेले होते.

Back to top button