भिगवण : पुनर्वसित गावांची नाळ तोडण्यास जबाबदार कोण ? | पुढारी

भिगवण : पुनर्वसित गावांची नाळ तोडण्यास जबाबदार कोण ?

भरत मल्लाव

भिगवण : तब्बल 165 वर्षांचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल अतिधोकादायक बनल्याने आता वाहतुकीसाठी बंद केला असला, तरी या पुलाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या 16 वर्षांपासून जड वाहतुकीला बंदी असताना एवढी वर्षे जड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? पुनर्वसित गावांची गैरसोय लक्षात घेऊन नवीन पुलासाठी 55 कोटी रुपये निधी मंजूर होऊन काम कशामुळे रखडले आहे आणि आता वाहतूक बंद झाल्याने 30 हून अधिक पुनर्वसित गावांची नाळ तोडण्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिकसळ पुलाच्या गुतावाचे दगड निखळू लागल्याने दुचाकीची वाहतूक वगळता हा पूल आता पूर्ण बंद करण्यात आला आहे. यामुळे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः पुनर्वसित गावातील रुग्ण, गरोदर महिलांचा ओढा हा प्रामुख्याने भिगवण, बारामती, इंदापूर, दौंड याकडे आहे. तसेच दैनंदिन व्यावसायिक दृष्टीने याच भागाला प्राधान्य आहे. शेतीमाल, मत्स्य व्यवसायासाठी हाच भाग केंद्रस्थानी आहे. परंतु पूल बंद केल्याने सगळ्या गोष्टींवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पुनर्वसित गावासाठी डिकसळ पूल हा महत्त्वाचा दुवा ठरला होता. मात्र, आता दुवाच निखळून पडू लागल्याने दळणवळणाचा फेरा वाढणार आहे. जिथे या पुनर्वसित गावांना हाकेच्या अंतरापासून ते अर्धा एक तासाचे अंतर होते ते आता दोन-तीन तासांवर आणि 15, 20, 30 किलोमीटर अंतरावर, त्यातही खराब रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. यामध्ये वयोवृद्ध रुग्ण, गरोदर माता, लहान मुलांचे अतोनात हाल होणार आहेत. या गावांना आता पर्याय म्हणून राशीन, करमाळाकडे धाव घ्यावी लागणार आहे.

नवीन पुलासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी
वास्तविक, 16 वर्षांपासून या पुलावरून जड वाहतुकीला पूर्णतः बंदी होती. परंतु, तरीही वाळू वाहतूक, उसाचे ट्रॅक्टर, हायवा आदी जड वाहनांची प्रचंड रेलचेल होत आली. यातून पुलाला अधिक धोका वाढत चालल्याने कित्येकदा अडथळे निर्माण केले. मात्र, ते काढून टाकण्यात आले. साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणाच्या तरी इशार्‍यावर चालत असल्याने पुलावरील बंदीला हरताळ पुसला जात होता अन्यथा हा पूल आजही पहाडासारखा डौलात उभाच दिसला असता. आता तरी नवीन पुलाचे काम जलदगतीने हाती घेणे गरजेचे बनले आहे. मात्र, त्यासाठी अधिकारी व राजकीय इच्छाशक्ती तेवढीच प्रबळ हवी.

संपर्क तुटलेली पूर्वेकडील महत्त्वाची गावे
कोंढार चिंचोली, टाकळी, खादगाव, गवळवाडी, पोमलवाडी, पारेवाडी, केतुर, गुईगाव, सोगाव, वाशिंबे, पोपळज, जेऊर, रामवाडी, हिंगणी कात्रज, जिंती, भगतवाडी, गुलमरवाडी, बाभळगाव, भिलारवाडी, कावळवाडी, देलवडी, कुंभारगाव आणि दिवे गव्हाणे.

Back to top button