पुणे : पाहुणे म्हणाले, ‘तुमची बाजरीची भाकरी अन् भरीत लय भारी!’ | पुढारी

पुणे : पाहुणे म्हणाले, ‘तुमची बाजरीची भाकरी अन् भरीत लय भारी!’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी 20 परिषदेला आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठी जगभरातील सर्वच जेवण उपलब्ध आहे. मात्र, त्यांना चव आवडली ती मराठमोळ्या बाजरी भाकरी अन् वांग्याच्या भरीतची. सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मेरियटमधून पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेले. तेथे भारतीय वस्तू अन् मराठमोळे स्वागत पाहून ते भारावून गेले होते. या ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांच्या चित्रांची पाहणी करताना त्यांची उत्कंठा शिगेला गेली होती.

परिषदेनिमित्त आलेल्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र शासनाचे आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, पुणे महानगरपालिकेच्या मुळा, मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना कुतूहलाने परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. बांबू उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंमध्ये रुची दाखवून आस्थेने माहिती घेतली.

तृणधान्यापासून बनवलेली उत्पादने आरोग्यदायी असून, ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा, असे स्टॉलधारकांना ’जी-20’ सदस्यराष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले. ’नमस्ते महाराष्ट्र’ म्हणत या वेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळे स्वागत करण्यात आले. दुपारी अनेकांनी बाजरीची भाकरी अन् वांग्याचे भरीत खाऊन पाहिले. त्यांना त्याची चव खूप आवडली. त्यानंतर या मंडळींनी विद्यापीठाच्या निसर्गसंपन्न अन् सुंदर वातावरणात फोटो काढण्याचा आनंद लुटला.

Back to top button