धायरी : वाहतुकीचे नियम पाळा अन् सुरक्षित राहा..! | पुढारी

धायरी : वाहतुकीचे नियम पाळा अन् सुरक्षित राहा..!

धायरी; पुढारी वृत्तसेवा : ‘अति घाई संकटात नेई, वाहने शिस्तीनी चालवा, वेगाने वाहने चालवू नका, मृत्यूस आमंत्रण देऊ नका, दुचाकीवर हेल्मेट वापरा, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवू नका, वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा,’ असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक रहिमा मुल्ला यांनी केले.

नवले पूल परिसरातील वडगाव येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानाप्रसंगी नागरिक व वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करताना त्या बोलत होत्या. नवले पूल परिसरात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 33वे राष्ट्रीय सुरक्षा अभियान राबविण्यात आले. परिसरातील सर्व ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलच्या वतीने या अभियानाचे संयोजन करण्यात आले.

या वेळी माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, अभिजित गायकवाड, सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शिंदे, सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

लेनचा वापर योग्य पद्धतीने करा, रस्त्यावर असलेल्या सूचना फलकांचे काटेकोरपणे पालन करा, पादचार्‍यांनी पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, हलगर्जीपणाने वाहन चालवू नका, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, आपले व इतरांचे जीवन सुरक्षित ठेवा, यांसह विविध वाहन नियमांचे याप्रसंगी प्रबोधन करण्यात आले.

Back to top button