पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक : ज्याच्याकडे अधिक विकास सोसायट्या, त्याचाच उमेदवार | पुढारी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक : ज्याच्याकडे अधिक विकास सोसायट्या, त्याचाच उमेदवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्वासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भारतीय जनता पक्ष यांच्यातील लढतीबाबतचे आडाखे बांधण्यास हवेली तालुक्यात आतापासूनच सुरुवात झाली आहे. ज्या नेत्यांकडे अधिक विकास सोसायट्या, त्यांचाच उमेदवार असे सूत्र ठरवून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. शिवाय, बाजार समितीची ही निवडणूक म्हणजे शिरुर-हवेली विधानसभेची मिनी रंगीत तालीमही असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध) या दोन्ही सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचेच प्राबल्य आहे.

मात्र, दोन्ही ठिकाणी भाजपचेही संचालक विजयी झाले आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या सत्तास्थांनांमध्ये तसा चंचुप्रवेश केला आहेच. त्यापुढे जाऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्वाच्या लढाईसाठीचा संघर्ष या निमित्ताने पहावयास मिळण्याची शक्यता अधिक आहे. हवेली तालुक्यातील विकास सोसायट्यांची संख्या 135 च्या आसपास आहे. या विकास सोसायट्यांवर आजही बाजार समितीचे माजी सभापती, उपसभापती आणि माजी संचालकांचेच वर्चस्व आहे.

विकास सोसायट्यांच्या संख्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मानली जात आहे, त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड कायम राखण्यास आम्हांला निश्चित यश येईल, असा सूर त्यांच्या नेत्यांमधून आळवला जात आहे. त्यामुळे भाजपला ही लढत तशी सोपी नाही. हवेली तालुक्यातील राजकीय संघर्ष उघडपणे दोन्ही पक्षांतून अपेक्षित असला तरी ऐनवेळी पक्ष बाजूला ठेवून नात्यागेात्यांमुळे एकमेकांना मदत होण्याचीही शक्यता अधिक आहे.

दुसरीकडे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठीही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण साखर कारखान्यापेक्षा सर्व शेतकर्‍यांचा शेतमाल विक्रीच्या निमित्ताने बाजार समितीशी संबंध येतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीमही समजली जात आहे. शिरुर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार आणि जिल्हा बँकेत विजयी झालेले भाजपचे प्रदीप कंद यांच्यामध्येच पुढील विधानसभेला सामना होण्याची शक्यता अगोदरपासूनच वर्तविली जात आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींप्रमाणेच या दोघांचीही ताकद बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागणार असल्याचे सांगण्यात येते.

मतदारसंघनिहाय संचालक संख्या
पुणे बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे हवेली तालुका आहे. तर बाजार समितीवर मतदारसंघनिहाय 18 सदस्यीय संचालक मंडळ कार्यरत राहील. त्यातील मतदारसंघनिहाय संचालकांची संख्या अशी- (1) विकास सोसायटी मतदारसंघ – 11 संचालक. त्यामध्ये 4 राखीव जागा आहेत. महिला संचालकांसाठी 2, इतर मागास प्रवर्ग 1 आणि 1 जागा विमुक्त जाती किंवा भटक्या जमातींसाठी राखीव आहे. (2) ग्रामपंचायत मतदारसंघ – 4 संचालक. त्यामध्ये 2 जागा राखीव आहेत. अनुसूचित जाती, जमातीमधून 1 संचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा राखीव आहे. (3) व्यापारी-आडते मतदारसंघ – 2 संचालक.(4) हमाल-तोलणार मतदार संघ – 1 संचालक

Back to top button