पुणे : महिलांना आजही सावित्रीबाईंसारखा संघर्ष ; रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : महिलांना आजही सावित्रीबाईंसारखा संघर्ष ; रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

भोर : पुढारी वृत्तसेवा : ‘पावणेदोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुलेंना जो त्रास व संघर्ष सहन करावा लागला तो संघर्ष अजूनही महिलांना करावा लागत आहे. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. अजूनही महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. माणसांचे मार्ग, ध्येय, कपडे, रस्ते बदलले, मात्र वैचारिकता बदलली नाही,’ असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. भोर येथील शाहू, फुले, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, समता परिषद, इनरविल क्लबने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले विचार महोत्सवात चाकणकर बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नॅसी गायकवाड, पत्रकार हलीमाबी कुरेशी, सीमा तनपुरे, विजया पाटील, सुजाता भालेराव डॉ. रोहिदास जाधव आदी उपस्थित होते.

पुढे चाकणकर म्हणाल्या, की समाज आणि पुरुषांमधील मानसिक विकृतीविरुद्ध महिलांची लढाई आजही आहे. भाकरीच्या तुकड्यासाठी लढाई होते आहे. महागाई, बेकारी, रोजगार यांबाबत कोणी बोलत नाही. अंधश्रध्दा मोठी आहे. मात्र, कोणीतरी ’कपड्यांवरून’ बोलून धार्मिक तेढ निर्माण करत आहे. जबाबदार व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेजबाबदारपणे बोलतात. राज्यात हा वणवा पेटला आहे आणि समाज काहीच बोलत नाही. ऐकणार्‍यांचे कान बधीर झालेत की काय, त्यामुळे बोलणार्‍यांचे फावते. नॅन्सी गायकवाड म्हणाल्या, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशात अजूनही लोकशाही फक्त कागदावरच आहे. पुरोगामीपणाचा फक्त आव आणला जात आहे. दुर्गम व ग्रामीण भागांत बेकारी, विषमता, अन्न व पाण्यासाठी समाजाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. महिलांच्या आत्मसन्माला ठेच लागता कामा नये. महिलांनी त्याविरोधात लढले पाहिजे, असे हलीमाबी कुरेशी यांनी सांगितले. या वेळी गायकवाड यांना ’राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले कार्यगौरव’ पुरस्कार, तर उल्लेखनीय काम करणार्‍या बारा महिलांचा गौरव करण्यात आला.

Back to top button