लोणी-धामणी : ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत | पुढारी

लोणी-धामणी : ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. परंतु, काही दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप हंगामाची पूर्णपणे वाट लावली. त्यातच आता रब्बीच्या पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. अगोदरच शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिवाळीनंतर शेतीच्या मशागती करून रब्बीची पेरणी सुरू केली. पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने ऊस व कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

उसामध्ये कांदा, हरभरा आदी अंतर्गत पिकेही केली आहेत. त्याबरोबरच कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. परंतु, सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी, यामुळे गव्हावर मावा तर आला आहेच. मात्र, कधी न येणारी अळीही यंदा गव्हावर दिसू लागली आहे. परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले. सध्या उपलब्ध रोपांमध्ये कांदा लागवड सुरू झाली आहे. मात्र, रोगट हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने नवीन लागवडही धोक्यात आली आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी विविध महागड्या औषधांची फवारणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Back to top button