केडगाव-चौफुला रस्ता उखडल्याने संकट; रस्त्यावर धुळीचे साम्राज्य | पुढारी

केडगाव-चौफुला रस्ता उखडल्याने संकट; रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : केडगाव-चौफुला रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी प्रशासनाने रस्ता जेसीबी यंत्राने उखडून टाकला आहे. प्रशासनाचा हा प्रकार खड्डे बुजविण्यासाठी योग्य ठरला असला, तरी धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने चालकांसाठी ते संकट बनले आहे. चौफुला-केडगाव हा रस्ता तीन किलोमीटर अंतर एवढा आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर दोनवेळा पूर्ण रस्ता बनविण्यासाठी आणि तीनवेळा डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सरकारच्या खर्चाची माया प्रशासनाने उधळली असून, त्याचे मूळ उद्दिष्ट साधता आले नाही.

खड्डेदुरुस्तीच्या नावाखाली मुरूम-माती टाकून जुजबी काम करणारा फंडा मध्यंतरी या प्रशासनाने सुरू केला होता. याबाबतची बातमी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली होती. कोट्यवधी रुपये खर्च करणार्‍या सरकारच्या या प्रशासनाने यात मोठा भ्रष्टाचार केला, असा समजच या रस्त्याने प्रवास करणार्‍या वाहनचालक आणि नागरिकांनी करून घेतला होता.

रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात सहा जानेवारी रोजी ऊस असलेल्या दोन ट्रॉल्या पलटी झाल्या. यामध्ये एक वृद्ध महिला आणि तरुण जखमी झाले. प्रशासनाला हा प्रसंग समजल्यावर प्रशासनाने मुरूम टाकून खड्डे बुजवणारा फंडा मोडीत काढून सरळ जेसीबीने रस्ता उचकून टाकला आहे. रस्त्यावरील खड्डे नामशेष करण्यासाठी डांबरी रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने रस्त्याचे सपाटीकरण केले आहे.

रस्त्याचे सपाटीकरण खड्डे बुजविण्यासाठी योग्य ठरले असले. तरी डांबराची जागासध्या धुरळ्याने घेतल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. उडणारी धूळ दुचाकी वाहनांना अपघाताचे कारण बनत आहे. रस्त्यावर कायमस्वरूपी उत्तम रस्ता करण्याची मागणी होऊ लागली आहे.

रस्ता नक्की कोणाच्या कार्यकक्षेत ?
रस्ता एका ठिकाणी काही अंतराचा पूर्णपणे उखडून टाकून सपाट केला असला, तरी संबंधित कामाबाबत प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही. काम करणार्‍या मजुरांना विचारले असता आम्हालाही काही माहीत नाही, असे ते सांगतात. यावरून नक्की काय प्रकार आहे, याची माहिती उपलब्ध होत नाही. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड यांच्याकडून याबाबतची माहिती मिळत असे. मात्र, सध्या हा रस्ता
राज्य महामार्गाकडे वर्ग झालेला आहे, अशा स्वरूपाची माहिती समजली आहे.

Back to top button