पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधनाला वाव देण्याची गरज : शरद पवार यांचे मत | पुढारी

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधनाला वाव देण्याची गरज : शरद पवार यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जगात आरोग्यासह शिक्षण, शेती, प्रशासन अशा विविध क्षेत्रात उत्तम संधी निर्माण केल्या जात आहेत. राज्यातील अनेक संस्थांनीही यावर काम करायला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन घडवून आणण्यासाठी संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिकाधिक वाव देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी आणि विद्यार्थी वसतिगृह संकुलाचे उद्घाटन रविवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या वेळी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना पहिल्या ’डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. या वेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते. हिमाचल प्रदेश सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळात नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री संजय अवस्ती यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

शरद पवार म्हणाले, ’जगात 100 पैकी 50 मुले सीरम इन्स्टिट्यूटची लस घेतात. जगातील 160 देशांमध्ये सीरमची लस वापरली जाते. सीरमने लसीकरणाच्या माध्यमातून भविष्यातील समस्यांचे उत्तर निर्माण केले आहे. त्याचबरोबर सामाजिक भानही कायम ठेवले आहे.’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, ’महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवायचे आहे. चीनमधून अनेक उद्योग बाहेर पडत असताना भारत ही बाजारपेठ व्यापू शकतो. त्यासाठी बुद्धिमान मनुष्यबळ आणि शिक्षणव्यवस्था हवी. चीननंतर स्टार्टअपमध्ये आपण दुसर्‍या क्रमांकावर आहोत. यामध्ये तंत्रज्ञानाने मोठा हातभार लावला आहे.’

काय म्हणाले फडणवीस ?
ताकदीचे मनुष्यबळ असेल तरच उद्योग उभे राहू शकतात. देशात उच्च आणि तंत्रशिक्षणाचा विस्तार करण्यात खासगी संस्थांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीला शिक्षणाच्या खासगीकरणाबद्दल संशय, नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, सर्वांच्या योगदानाशिवाय विस्तार होऊ शकत नाही. भारती विद्यापीठासारख्या संस्थांनी दर्जेदार शिक्षण, गुणवत्ता निर्माण केली.
कोरोना काळात सीरमने जगाला आणि भारताला जीवनदान देण्याचे काम केले. जगाच्या पाठीवर भारताची ताकद दाखवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहिले आणि भारताच्या कानाकोपर्‍यात लस पोहोचवण्याचे काम झाले.

पवार-फडणवीस एकाच गाडीत !
भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय कोपरखळ्या रंगणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेस्टहाऊसपासून पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला. गाडीत मागच्या सीटवर पवार आणि फडणवीस एकत्र बसलेले पहायला मिळाले. दुसरीकडे लेडीज हॉस्टेलपासून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत पुन्हा एकाच गाडीतून प्रवास केला. या वेळी मात्र, पुढच्या सीटवर विश्वजित कदम होते. राज्यातील राजकीय गदारोळात पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Back to top button