मोशी, चांडोलीत पुन्हा 40 टक्के टोल; स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात | पुढारी

मोशी, चांडोलीत पुन्हा 40 टक्के टोल; स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक महामार्गावर मोशी, चांडोली टोलनाके पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त दै. ’पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांमधून टोलविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे. अगोदर या रस्त्याचे प्रस्तावित चौदा पदरी रुंदीकरण करा, मग खुशाल टोलवसुली करा अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. ज्या रस्त्यावरील टोल आकारणीचा कालावधी संपतो, त्या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी अंशतः टोल आकारणी शासनास करावी लागते असा नियम पुढे करत मोशी महामार्गावर मेंटेनन्स म्हणजेच देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा टोल लादला गेला आहे.

ज्या दिवशी टोल वसुली संपली त्या दिवशीची टोल वसूल केलेली टोलपावती म्हणजेच शेवटच्या टोलभारच्या रक्कमेवर 40 टक्के इतकी रक्कम पुढे मेंटेनन्ससाठी पथकर म्हणून वसुल केली जाते अशी अधिकृत माहिती अधिसूचना दि. 15 जुलै 2022 रोजी एस ओ नं. 3205 (ई) या गॅझेट नोटीफिकेशनमधून पुढे आली आहे. यामुळे टोलमुक्ती होण्यासाठीचा लढा अधिकच तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे.

याबाबत पुणे-नाशिक महामार्गचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी सांगितले की, नागरिकांच्या मागणीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे कळविले आहे. या रस्त्यावर चौदा पदरी रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. काम पूर्ण झाल्यास टोल देण्यास नागरिकांची देखील हरकत नाही; मात्र सद्या वाहतूक कोंडीने प्रचंड वैतागलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडी आणि त्यावर टोलचा भार मान्य नसून तूर्तास या रस्त्यावर टोलवसुली केली जाऊ नये अशी मागणी गडकरींकडे केली आहे. मागे वाहतूक कोंडीविरोधात आंदोलन करणारे चाकण येथील आंदोलक व मी स्वतः गडकरींना भेटून परिस्थिती सांगितली होती असेही ते पुढे म्हणाले.

Back to top button