पिंपरी : वृद्ध खचताहेत ? गेल्या महिन्यात सहा वृद्धांच्या आत्महत्या

पिंपरी : वृद्ध खचताहेत ? गेल्या महिन्यात सहा वृद्धांच्या आत्महत्या
Published on
Updated on

संतोष शिंदे  :

पिंपरी : राजा-राणी असलेल्या नवरा-बायकोच्या संसारात घरातील ज्येष्ठ मंडळी एकटी पडू लागली आहेत. घरातील वृद्धांची देखभाल, तसेच त्यांची शुश्रुषा करणे, हेदेखील नवरा-बायकोच्या वादाचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पोलिस चौकशीत समोर येऊ लागले आहे. मागील महिन्यात सहा वृद्धांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचत आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेली मंडळी स्थायिक झाली आहेत. गुंठा, अर्धा गुंठा जागेत बांधकाम करून ही मंडळी राहत आहेत.  दरम्यानच्या काळात मुलांची लग्ने झाल्याने कुटुंबे मोठी झाली. घरातील सदस्य वाढल्याने राहत्या घरातील जागा कमी पडू लागली. सध्याचे जमिनीचे वाढलेले भाव परवडणारे नसल्याने जुन्याच घरात दाटीवाटीने कुटुंबीय राहत असल्याचे दिसून येते. छोट्याशा घरात जुळवून घेत असताना मुलांना वृद्ध मंडळींची अडचण होऊ लागली आहे. ज्याने पै- पै जोडून घर बांधले, त्यांनाच मुले घराबाहेर काढत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. यातूनच काहीजण नैराश्याच्या गर्ततेत अडकून आत्महत्येसारखे पाऊल उचलू लागले आहेत. एकंदरीतच शहरात वृद्धांच्या वाढत्या आत्महत्या एक चिंतेची बाब ठरू लागली आहे.

शहरातील अनेक प्रकरणांमध्ये वृद्धांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात शरीराला जडलेली व्याधी वृद्धांना स्वस्थ बसून देत नाही. दिवसेंदिवस डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडतो. तरीही आराम मिळत नसल्याने काहीजण गळफासासारखा अघोरी पर्याय निवडतात.
नोकरी निमित्ताने नोकरदार ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसर्‍या शहराकडे स्थलांतरित होत आहे. स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटूंब पध्दती रुढ होऊ लागली आहे. त्यातच जोडीदाराचा मृत्यू झाल्यास वृद्ध खचून जातात. सोबत कोणीच नसल्याने त्यांना घर खायला उठते. एकाकीपणा आल्याने देखील वृद्ध मंडळी आयुष्य संपवण्याच्या निर्णया पर्यंत पोहचू लागली आहेत.

वृद्ध मंडळी तरुणांच्या तुलनेत सहजासहजी आपल्या भावना व्यक्त करीत नाहीत. शरीराच्या व्याधींमुळे ते कधी नैराश्येत जातात हे त्यांना देखील कळत नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे अपेक्षित आहे. तसेच, वृद्धांना जगण्यासाठीचे समोर चांगले कारण निर्माण करणे गरजेचे आहे. तब्येतीनुसार छोटी मोठी कामे द्यावीत जेणेकरून घरातील वृद्धांचे मन त्या गोष्टीत रमून जाईल.
-डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचार तज्ञ, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी- चिंचवड.

घरातील सदस्य समजून घेत नसल्याच्या तक्रारी घेऊन वृद्ध मंडळी दररोज पोलिस ठाण्यात येतात. त्यांची समजूत काढून पुन्हा घरी पाठवले जाते. वयानुसार त्यांच्यात चिडचिडेपणा येत असल्याचे जाणवते. नुकतेच 19 डिसेंबर 2022 रोजी एका 67 वर्षीय वृद्ध महिलेने अशाच प्रकारातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
– राजेंद्र निकाळजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे.

 

सरकारी योजनांपासून अनभिज्ञ

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी- सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 पारित केला आहे. तसेच, केंद्र आणि राज्य मिळून वेगवेगळ्या योजना राबवत आहे.  मात्र, या योजनांपासून ज्येष्ठ मंडळी अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news