पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने मोफत बससुविधा उपलब्ध करून दिली होती. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने ती बसही बंद झाली. कोरोना आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू झाली. परंतु, बस सुरू नाही. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी मिळून आयुक्त दालनात शाळा भरवण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सुत्रे हलली व बस सुरू करण्याच्या फाईलवर आयुक्तांनी सही केली. मात्र, बस मिळण्याच्या प्रतिक्षेतच हे वर्षे जाते की काय? असा सवाल पालक विचारत आहेत. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या रावेत, चिखली, मोशी, चर्होली आदी भागांतील सात शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससुविधा देण्यात आली होती. कोरोना काळापासून ही सुविधा बंद करण्यात आली. त्यानंतर बससुविधा देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होती.
मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बससेवा सुरू करण्यासाठी तारीख पे तारीख देण्यात येत होती. शेवटी शहरातील काही संघटनांनी या विद्यार्थ्यांना घेवून आयुक्तांच्या दालनातच शाळा भरविणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर बस सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आली. या संदर्भात माहिती घेण्यासाठी पालिका उपायुक्त संदीप खोत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.
जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्या. तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. मात्र, याकडे प्रशासन का दिरंगाई करत आहे कळत नाही. यावर्षीचे हे शैक्षणिक वर्ष संपत आले. तरीही प्रशासनाकडून कसलीही कारवाई होत नव्हती. शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनातच या विद्यार्थ्यांची शाळा भरविण्याचा इशारा दिला.
– प्राजक्ता रूद्रवार (अध्यक्ष, सहगामी फाउंडेशन)