“तुमच्या हातात सत्ता आहे, द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा, आमच्या जिवात जीव असेपर्यंत..”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर | पुढारी

"तुमच्या हातात सत्ता आहे, द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा, आमच्या जिवात जीव असेपर्यंत.."; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे, पुढारी ऑनलाईन: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही संपताना दिसत नाही. या संदर्भात काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. माझे विधान तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर केसेस दाखल करा, अशा शब्दांत अजित पवारांनी पलटवार केला आहे.

गुरुवारी अजित पवार यांनी केलेल्या विधानावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली होती. आज याबाबत अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. यावर बोलताना पवार म्हणाले की, मला पुन्हा पुन्हा हे विषय अजिबात वाढवायचे नाहीत. मला फक्त माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि जनतेच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय बोलावे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर आमच्यावर केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही आमच्या जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी कधीही द्रोह करणार नाही. आमच्या पुढच्या १० पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. त्यांनी उगीच काहीतरी बोलायचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेचे पालन सर्वांनी केले पाहिजे. मी मांडलेली भूमिका प्रत्येकाला पटलीच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पण मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते लोक कोण? माफी मागण्यासाठी मी काय गुन्हा केलाय? किंवा कोणता अपशब्द वापरलाय? राज्यपाल, सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी बेताल वक्तव्य करत अपशब्द वापरले आहेत. त्याबाबत कुणी बोलायला तयार नाही. कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षाकडून होतात. हे काही बरोबर नाही. त्यांना त्यांची जी भूमिका मांडायची, ती त्यांनी मांडावी. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. राज्यातील जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचे जनता स्वागत करेल, असे अजित पवारांनी रोखठोकपणे सांगितले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना, छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Back to top button