राज्यात 122 क्रीडा संकुले उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

राज्यात 122 क्रीडा संकुले उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, पुढारी वृत्तसेवा : खेळाडूला जिद्द चिकाटी, मेहनत आवश्यक असते. सध्या राज्यात 155 क्रीडा संकुले आहेत. मात्र, आगामी काळात आणखीन सुविधा उभारण्याच्या द़ृष्टीने 122 क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांसह खेळाडू उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळाचे महत्त्व देशाने ओळखले आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शनाने खेळाची वाटचाल सुरू आहे. खेळाडूंना चांगल्या सुविधा तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देण्यासंदर्भात बैठक घेऊन परदेशी कोच बोलावण्याचा निर्णय घेऊन त्याचा सगळा खर्च सरकार करेल.

पवार म्हणाले, खेळाडूंनी खेळ भावनेने रसिकांची मने जिंकावी. नियमांत उल्लंघन होऊ देऊ नका. दर दोन वर्षांनी अशी स्पर्धा घ्यावी. ऑलिम्पिक भवनाला निधी ही मंजूर झाला आहे; परंतु मान्यता मिळालेली नाही ती या सरकारने द्यावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी तर सूत्रसंचालन जितेंद्र जोशी यांनी केले.

दादा दोन वर्षांनी विरोधी नेते म्हणूनच या राज्य सरकार दर दोन वर्षांनी ही स्पर्धा नक्की भरवेल आणि त्यावेळी अजितदादा तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कार्यक्रमाला नक्की हजर रहा. आम्ही स्वागत करू. त्याचबरोबर ऑलिम्पिक भवनसंदर्भात येत्या दहा दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले.

Back to top button