बारामती : महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचा बारामतीत शुभारंभ | पुढारी

बारामती : महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचा बारामतीत शुभारंभ

बारामती : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त पुणे विभागातील क्रीडाज्योत रॅलीचा जिल्हा क्रीडासंकुल बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.  या वेळी तहसीलदार विजय पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, बारामती तालुका क्रीडाधिकारी अनिल सातव, दौंड तालुका क्रीडाधिकारी महेश चावले आदी उपस्थित होते.  या वेळी कांबळे म्हणाले की, राज्यस्तरावरील महाराष्ट्र ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धा पार पाडण्याचा मान बारामतीला मिळाला आहे. या कबड्डी स्पर्धा चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात येत आहे. या क्रीडाज्योत रॅलीमुळे बारामती शहरात स्पर्धांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागातील या क्रीडाज्योत रॅलीचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले. राष्ट्रीय कबड्डीपटू दादा आढाव, विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज व तुळजाराम चतुरचंद कॉलेजचे विद्यापीठ व राष्ट्रीय खेळाडू यांनी क्रीडाज्योत घेऊन रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत मार्गावरील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडा मंडळे, खेळाडू सहभाग घेणार आहेत.  शहरातील तीन हत्ती चौक, भिगवण चौक, सुभाष चौक, गांधी चौक, गुणवडी चौक, कारभारी सर्कल, महात्मा फुले चौक, खंडोबानगर पेट्रोल पंपमार्गे कार्‍हाटी चौक, मोरगाव, जेजुरी, सासवड, फुरसुंगी, हडपसर ते विभागीय क्रीडासंकुल येरावडा, असा क्रीडाज्योत रॅलीचा मार्ग आहे.  जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी उपक्रमाबाबत माहिती देऊन रॅलीच्या मार्गावर वाहतूक नियोजन व सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

Back to top button