पुणे : पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू ; एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार | पुढारी

पुणे : पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू ; एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बावडा-वकीलवस्ती (ता. इंदापूर) येथील युवकाचा मुलासह कोकरूड (ता. शिराळा) येथे शनिवारी (दि. 24) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. महेंद्र अशोक घोगरे (वय 35) व आरव महेंद्र घोगरे (वय 4) अशी या पिता-पुत्राची नावे आहेत. या दोघांच्या पार्थिवावर वकीलवस्ती येथील बोकूडदरा येथे शनिवारी (दि. २४) मध्यरात्री शोकाकुल वातावरणात एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेंद्र घोगरे यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. ते वालचंदगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये नोकरीस होते. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी ते वालचंदनगरहून शनिवारी सकाळी चुलत बंधू ऋषिकेश मोहन घोगरे यांचेबरोबर चालले होते. गाडीमध्ये दोन्ही चुलत बंधूंची कुटुंबे होती. प्रवासात कराड- रत्नागिरी मार्गावर कोकरुड (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या कोकरूड-नेर्ले पुलावर त्यांची चारगाडी गाडी पुलाच्या कठड्यास धडकली.

धडक जोरदार असल्याने महेंद्र घोगरे व आरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये महेंद्र घोगरे यांच्या पत्नी रूपाली जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. महेंद्र घोगरे यांना दोन मुले होती, त्यातील धाकटा आरव याचा या अपघातात मृत्यू झाला.  महेंद्र घोगरे यांचे मागे आई-वडील, पत्नी रुपाली, मुलगा शिवेंद्र, भाऊ जितेंद्र असा परिवार आहे. एकाच वेळी  वडील व  मुलाचा मृत्यू झाल्याने बावडा-वकीलवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button