पिंपरी : अपघात घडला, कसा? शास्त्रीय पद्धतीने होणार विश्लेषण | पुढारी

पिंपरी : अपघात घडला, कसा? शास्त्रीय पद्धतीने होणार विश्लेषण

संतोष शिंदे

पिंपरी : उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात अपघाताच्या छोट्या-मोठ्या तसेच गंभीर घटना हा चिंतेचा विषय बनला आहे. अपघात कमी करण्यासाठी अपघातांच्या कारणाचे शास्त्रीय विश्लेषण करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात एक पथक नेमून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार, आता अपघातांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने घेतली कार्यशाळा
अपघातांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पोलिस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची कार्यशाळा आयोजित केली होती. अपघातांचा शास्त्रीय व चांगल्या गुणवत्तेचा डेटा उपलब्ध करणे हा यामागचा हेतू आहे. याचा उपयोग भविष्यातील अपघात रोखण्यासाठी होणार आहे.

तीन मुद्द्यांवर तयार केला जाणार अहवाल
अपघात घडल्यानंतर तपासी अधिकारी चालक, वाहन आणि पायाभूत सुविधा या तीन मुद्द्यांवर अभ्यास करून अहवाल तयार करणार आहेत. तसेच अपघातापूर्वी, अपघातावेळी आणि अपघातानंतरच्या परिस्थितीचा शास्त्रीयदृष्ट्या आढावा घेण्यात येणार आहे.

अभ्यासले जाणारे मुद्दे

चालकाचे आरोग्य कसे होते.
चालकावर कशाचा प्रभाव होता का ?
चालकाचे लक्ष विचलित करण्यास कारणीभूत घटक.
सदोष उपकरणे कोणती.
यांत्रिक समस्या उद्भवली होती का?
टायरची स्थिती कशी होती.
चिन्ह नसलेले, निसरडे, खड्डे आणि तीव्र वळण असलेले रस्ते
सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर केला होता का?
वाहनांवर अनावश्यक साहित्य लावले होते का?
वाहनाचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट.
अपघातानंतर किती वेळात प्रथम प्रतिसाद मिळाला.
रुग्णवाहिका उपलब्ध झाली का?
रुग्णालयात तत्काळ प्रवेश मिळाला का?

  • अपघातानंतर संबंधित ठिकाणाचे अपघात स्थळाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी (गुरुत्वाकर्षण केंद्रबिंदू) आणि डायरेक्शन ऑफ फोर्स (बलाची दिशा) याचादेखील अभ्यास केला जाणार आहे. तसेच, रस्त्यावर असलेल्या टायरच्या खुणा विचारात घेऊन निरीक्षण नोंदवले जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रानुसार अपघाताचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना  scientific crash Investigation या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार, अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण करून अहवाल तयार करण्यात येतो. भविष्यातील अपघात व त्यापासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी या अहवालांची मदत होणार आहे.

                        – सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button