डाळज चौफुला झाला धोकादायक; ठोस उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी | पुढारी

डाळज चौफुला झाला धोकादायक; ठोस उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

कालठण; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज क्र. 2 चौफुला (ता. इंदापूर) येथील चौकातील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ता ओलांडताना अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासन असंवेदनशील असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. अजून आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर चौकातील वाहतुकीची समस्या सुटेल? असा सवाल विचारला जात आहे.

महामार्गावरील डाळज क्र. 2 येथील चौक वालचंदनगर, कळस गावाकडून आलेला रस्ता येथे महामार्गाला जोडलेला आहे. डाळज, कुंभारगाव गावाकडे जाणारा रस्ताही याच ठिकाणी जोडला गेला आहे. यामुळे पुणे बाजूकडून आलेल्या वाहनांना कळसकडे वळण्यासाठी महामार्गावर प्रतीक्षा मार्गिका नसल्याने मुख्य मार्गिकेवर थांबावे लागते. सध्या ऊसवाहतुकीमुळे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. डाळज क्र. 2 येथील चौकात पुणे -सोलापूर बाजूकडून येणार्‍या वाहनांना चढ लागतो.

यामुळे चढाला वाहन असताना वेग कमी झालेल्या वाहनांचा वर आल्यानंतर वेग वाढतो. परिणामी, या संवेदनशील चौकात अपघाताला निमंत्रण मिळते. यामुळे येथे संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सोलापूर बाजूने आलेल्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे पांढरेपट्टे काहीच कामाचे नसल्याचे दिसून येते. कारण, पांढरे पट्टे या सगळ्या गोष्टींना न जुमानता वाहन दामटण्याचा प्रकार येथे नेहमीच आढळून येतो. यामुळे येथे वारंवार अपघात होतात. यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, काहींना अपंगत्व आले आहे.

 

Back to top button