पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना, चार कामगारांचा मृत्यू
पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे शहरातील काचेच्या कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना येवलेवाडी येथील युनिटमध्ये घडल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
पुणे अग्निशमन विभागातील कोंढवा येथील स्टेशन ऑफिसर समीश शेख यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पुणे शहरातील येवलेवाडी भागात ट्रकमधून काच उतरवत होते. यावेळी कामगारांच्या अंगावर काच पडली. कामगार जड काचांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
काचेच्या कारखान्यात काही कामगार जड-ड्युटी ग्लासेस उतरवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी काच त्यांच्यावर पडली. या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून तीन जखमी आहेत, अशी माहिती पुणे शहरचे डीसीपी आर राजा यांनी दिली.