पुणे: घरफोडीतील चोरटा मुद्देमालासह २४ तासांत जेरबंद, किकवी पोलिसांची कामगिरी | पुढारी

पुणे: घरफोडीतील चोरटा मुद्देमालासह २४ तासांत जेरबंद, किकवी पोलिसांची कामगिरी

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा: घरातील सर्वजण देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत एकाने घरफोडी करत तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. किकवी पोलिसांनी तांत्रिक व इतर बाबी तपासून चोरट्याला मुद्देमालासह २४ तासांत जेरबंद केले आहे. चोरटा हा गावातीलच निघाल्याने संताप व्यक्त होत आहे.

अजय लक्ष्मण बोबडे (वय २५ रा. राजापूर, ता. भोर ) असे चोरट्याचे नाव आहे. ही घटना मंगळवार ६ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान राजापूर येथे घडली होती. घराचे कुलूप तोडून सोन्याचा राणीहार, कर्णफुले, २ अंगठया व ३५ हजार अशा एकूण साडेतीन लाखांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला होता. घर मालक विजय बोबडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अजय बोबडे याला पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली.

फिर्यादी हे त्यांची पत्नी व मुलीला घेऊन सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भोंगवली येथील दत्तमंदिरात दर्शनाला गेले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. घरी परत आले असता दरवाजाचा कडी व कोयंडा तुटलेला दिसला. कपाटाच्या लॉकरमधील दागिने व रोकड चोरीस गेली होती. घरमालकाने याबाबत संशय व्यक्त केला होता. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, मयूर निंबाळकर, योगेश राजीवडे यांनी छडा लावून आरोपीला ताब्यात घेतले.

असा लावला छडा

फिर्यादी हे कुटुंबासह रात्री सात वाजता दर्शनाला गेले होते. त्यानंतर अवघ्या दीड तासात भर गावात घरफोडी झाली. चोरी होण्याची घटना शक्यतो मध्यरात्री अथवा दुर्लक्षित बंद घरात घडतात. चोरीची वेळ चुकीची व संशयावरून किकवी पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.

Back to top button