भोसरीत मिळकत कर वसुली जोरात | पुढारी

भोसरीत मिळकत कर वसुली जोरात

भोसरी, पुढारी वृत्तसेवा: शहरातील अनेक नागरिक, व्यावसायिक, दुकानदार महापालिकेची घरपट्टी कर वेळेत भरत नाहीत. अनेक वेळा पालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत नोटिसा पाठविण्यात येतात. परंतु नागरिक कर वेळेत भरत नसल्याने हा कर गोळा करण्यासाठी पालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी विशेष मिळकतकर वसुली पथकदेखील स्थापन करण्यात आले आहे. भोसरी परिसरातील कर थकबाकीदाराकडून हे पथक थकीत कर गोळा करीत असून कर न भरणार्‍या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यात येत आहे.

भोसरी परिसरात अनेक वर्षापासून लाखोंचे कर थकीत आहे. परिसरातील कंपनी चालक, व्यावसायिक, दुकानदार, संस्था, शाळा, नागरिक अनेक वर्षांपासून पालिकेचा कर भरत नाहीत. नागरिक कर भरत नसल्याने अनेकांचे थकीत कर लाखोंच्या घरात गेले असल्याचे चित्र आहे.

पालिका प्रशासनाने थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असणार्‍यांवर जप्ती पूर्वीची नोटिस बजाविण्यात येत आहेत. त्याकरिता वेळेप्रसंगी थकबाकीदारांची मालमत्ता सील ही करण्यात येत आहे. या पथकाला करवसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

भोसरी करआकारणी व करसंकलन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. कर वसुलीसाठी या पथकामध्ये प्रशासन अधिकारी, झोनल ऑफिसर, गट लिपिक, कार्यालयीन कर्मचारी व सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. जे मालमत्ताधारक कराचा भरणा करत नाहीत. त्यांच्या मालमत्ता सील करण्याचे काम हे पथक करीत आहे.

Back to top button