दौंड : नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

दौंड : नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  नायलॉनचा मांजाने गळा कापल्याने दौंड शहरात शनिवारी(दि.५) दुपारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला,पन्नालाल यादव (वय 45 मूळ रा. गोरखपुर, उत्तर प्रदेश सध्या रा. पासलकर वस्ती दौंड) असे मृत्यू पडलेल्याचे नाव आहे.
यादव हे फरशी पुरविण्याचे काम करत होते. ते आपल्या दुचाकीवरून कामाला निघाले होते. नगर मोरी चौकात कोणीतरी व्यक्ती नायलॉनच्या मांजाने पतंग उडवत होती.

दुचाकी चालवताना पन्नालाल यादव यांना तो मांजा दिसला नाही त्यामुळे त्यांचा गळा कापला गेला. नगरमोरी चौकापासून जवळच असलेल्या दौंड उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या सहकार्याने त्यांना नेले. यादव यांची श्वसननलिका या मांजामुळे कापली गेली होती. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय वाघमोडे, डॉ. लाड, डॉ. बुरटे यांनी त्यांना वाचविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले

नायलॉन मांजा विक्री उखडण्याची गरज

नायलॉन मांजावर बंदी असतानाही दौंड शहरात त्याची खुलेआम विक्री होते. पोलीसांनी ही विक्री मुळापासून उखडण्याची गरज आहे. मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी चर्चा या परिसरात होती. पतंग उडवण्याच्या निष्काळजीपणामुळे एका 45 वर्षे व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला यावरून पोलीस प्रशासनाने बोध घ्यावा.

Back to top button