पुण्यातून ताज्या भाज्या, फळे सिंगापूरला रवाना | पुढारी

पुण्यातून ताज्या भाज्या, फळे सिंगापूरला रवाना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून नुकत्याच सुरू झालेल्या विमानसेवेमुळे आता आयात-निर्यात हळूहळू वाढणार आहे. शुक्रवारी (दि. 2) पुणे-सिंगापूर विमानाने पहिला कार्गो कंटेनर सिंगापूरसाठी रवाना झाला. यात पुणे आणि परिसरातील 1 हजार 650 किलो ताज्या भाज्या आणि फळे होती. पुणे विमानतळावरून पूर्वी फक्त दुबई या एकाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा होती. मागील महिन्यात केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे पुणे दौर्‍यावर असताना पुण्यातून 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली.

त्या घोषणेनुसार पुण्यातून आता बँकॉक आणि सिंगापूर या दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे, तर आगामी काळात आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या आंतरराष्ट्रीय सेवेमुळे पुण्यातून आता आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे 1650 किलो भाज्या आणि फळांची शुक्रवारी पुण्यातून सिंगापूरला निर्यात करण्यात आली.

208 बॉक्स पाठविले
पुणे विमानतळावरून भाज्या आणि फळांचे एकूण 208 बॉक्स शुक्रवारी सिंगापूरला पाठविण्यात आले. यात मेथी, पालक, कारले, आर्वी, तोंडली, वांगी, सुरण, कोबी, वाटाणा, तांबडा भोपळा, दुधीभोपळा, गवार, आवळा, मिरची, लिंबू, बोर, नारळ, चिकू, सीताफळ, डाळिंब, घेवडा, भेंडी, ओकरा, शेवगा, गिलके यांसारख्या विविध प्रकारच्या 1650 किलो वजनाच्या भाज्या आणि फळांचा समावेश होता.

पुणे विमानतळावरून शुक्रवारी सायंकाळी सिंगापूरला जाणार्‍या विमानातून पहिला कार्गो कंटेनर पाठविण्यात आला. भविष्यात पुण्यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळेल.
                                                                        – संतोष ढोके,
                                                                  संचालक, पुणे विमानतळ

Back to top button