पुणे : जायका प्रकल्पातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द | पुढारी

पुणे : जायका प्रकल्पातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जायका प्रकल्पासाठी नेमलेल्या अभियंत्यांच्या बदल्या महापालिका आयुक्तांनी रद्द केल्या असून, प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्पातील कोणत्याही अधिकार्‍याच्या बदल्या करू नयेत, असे आदेश दिले आहेत. नदी सुधार प्रकल्पांतर्गत शहरातील नद्यांमध्ये मिसळणारे मैलामिश्रित पाणी रोखण्यासाठी जपानच्या जायका कंपनीच्या अर्थसाहाय्याने 1473 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे मलवाहिनी टाकण्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

नायडू, भैरोबानाला आणि धानोरी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणच्या कामाचे अंतिम आराखडे मंजूर झालेले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी कक्ष स्थापन केला. त्यात 33 अधिकार्‍यांचा समावेश आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने कक्षातील अभियंत्यांच्या परस्पर बदल्या केल्याने अडचणी निर्माण झाल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी अभियंत्यांच्या बदल्या रद्द केल्या. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अधिकार्‍याची बदली करू नये, अपवादात्मक स्थितीत बदली केली, तर आयुक्तांची मान्यता घ्यावी, असे आदेश दिले आहेत.

Back to top button