पुणे : पीएसआय विभागीय स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर | पुढारी

पुणे : पीएसआय विभागीय स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तर्फे (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी घेतल्यानंतर लगेचच 249 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली असून, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (ऑप्टिंग आऊट) 10 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एमपीएससीने ही माहिती दिली.

शासन सेवेतील पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेऊन 23 सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. त्यात शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 31 उमेदवारांची चाचणी डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली. चाचणीचा कार्यक्रम संपल्यावर लगेचच 249 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम पडताळणीअंती काही उमेदवारांच्या शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. न्यायालयात, न्यायाधीकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. काही उमेदवारांवर प्रतिरोधित करण्याची कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Back to top button