पुणे : थकबाकीदारांचा महावितरणला 70 हजार कोटींचा शॉक | पुढारी

पुणे : थकबाकीदारांचा महावितरणला 70 हजार कोटींचा शॉक

शिवाजी शिंदे

पुणे : विविध वर्गवारीतील वीजग्राहकांनी 70 हजार कोटींची रक्कम थकवून एक प्रकारे महावितरणलाच शॉक दिला आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण सर्व पद्धती वापरत असली, तरी कंपनीची झोळी रिकामीच राहत आहे. ही थकबाकी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. यात विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडे 45 हजार कोटी रुपये थकबाकी असून, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडे 10 हजार कोटी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्याची कोणतीही शाश्वती नाही.

कोरोना संपून दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्याचा परिणाम राज्याच्या सर्वच भागांत असलेल्या महावितरण वीज कंपनीवर झालेला दिसून येत आहे. राज्यातील घरगुती, शेतीपंप, वाणिज्यिक, लघुदाब, ग्रामीण व यंत्रमाग, नागरी पथदिवे, पाणीपुरवठा योजना, औद्योगिक, लघुदाब अशा राज्यातील विविध प्रकारच्या वीजग्राहकांकडे 70 हजार कोटींहून अधिक थकबाकी आहे. ती कशी वसूल करायची, याचे आव्हान महावितरणच्या व्यवस्थापनासमोर आहे.

राज्यात महावितरण वीज कंपनीचे मुंबई येथे मुख्यालय आहे. तर, पुणे, कल्याण, औरंगाबाद आणि नागपूर असे चार प्रादेशिक विभाग आहेत. या विभागाच्या माध्यमातून परिमंडल स्तरावर थकीत वीजबिल वसुलीबाबत सूचना देण्यात येतात. त्यानुसार दररोजची कामे सांभाळून कर्मचारी आणि अधिकारी यांना ही थकीत वीजबिलांची रक्कम वसूल करावी लागत आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 44 लाख 62 हजार शेतकर्‍यांकडे 45 हजार 840 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर, ग्रामीण व नागरी पथदिवे व पाणीपुरवठा योजनेकडे एकूण 9 हजार 635 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पथदिव्याची थकबाकी 2 हजार 861 कोटी रुपये इतकी असून, पाणीपुरवठा योजनेची थकबाकी 6 हजार 774 कोटी रुपये इतकी आहे.

घरगुती ग्राहकांकडे 1923 कोटी रुपयांची थकबाकी असून, वाणिज्यिक ग्राहकांकडे 500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर, औद्योगिक ग्राहकांकडे 2500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यंत्रमाग ग्राहकांकडे 442 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या लघुदाब ग्राहकांकडे 6600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या उच्चदाब ग्राहकांकडे 3347 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

वसुलीत येतात अडथळे
राज्यात सर्व वर्गवारीतील एकूण सुमारे 40 लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. मात्र, एकाच थकबाकीदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्यामुळे नियमानुसार ग्राहकांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे थकबाकीचादेखील आकडा वाढला आहे. महावितरण थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीदेखील काही ग्राहक महावितरणची फसवणूक करून पुन्हा वीजपुरवठा सुरू करीत आहेत. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Back to top button