राज्यात यंदा 14 लाख 83 हजार रक्तपिशव्यांचे संकलन | पुढारी

राज्यात यंदा 14 लाख 83 हजार रक्तपिशव्यांचे संकलन

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : शासन, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढ्या अशा विविध घटकांकडून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 14 लाख 83 हजार रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून 2 लाख 19 हजार 750 रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे.

रक्तसंकलनात गेल्या दोन वर्षांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. कोरोनाकाळातही पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक रक्तसंकलन झाले होते. 2020 मध्ये राज्यात 15 लाख 45 हजार 836 रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 2 लाख 4 हजार 345 पिशव्यांचे संकलन होते. 2021 मध्ये 16 लाख 75 हजार रक्तपिशव्या जमा झाल्या होत्या.

दिवाळीनंतर रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत. त्यामुळे आठवडाभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. सध्या राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे आठवड्याहून जास्त दिवस पुरेल इतका साठा आहे. मात्र, पुन्हा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शिबिरे वाढविण्याचे तसेच रक्तदात्यांनी स्वत: रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे आहेत. पुणे जिल्ह्यात 64 रक्तपेढ्या कार्यरत आहेत. यापाठोपाठ मुंबईत 58, नाशिकमध्ये 50, नागपूर 29, ठाणे 40, कोल्हापूर 37, अकोला 28, लातूर 25; तर औरंगाबादमध्ये 16 रक्तपेढ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात वर्षभरात साडेतीन ते चार हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.

कंपन्या, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था अशा विविध घटकांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांची संख्या वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही. महिलांच्या रक्तदानाचे प्रमाण काहीसे कमी आहे. महिलांनी स्वत: रक्तदानासाठी पुढे यायला हवे. सर्व निरोगी रक्तदात्यांनी तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे. रक्तदानानिमित्त मूलभूत रक्तचाचण्याही नियमितपणे केल्या जातात आणि आरोग्याबद्दल जागरूकता येण्यास मदत होते.
                                        – डॉ. अरुण थोरात, राज्य रक्त संक्रमण परिषद

राज्यात गेल्या चार वर्षांतील रक्तसंकलन (रक्तपिशव्या)
वर्ष          रक्तसंकलन
2019 17 लाख 23 हजार
2020 15 लाख 46 हजार
2021 16 लाख 75 हजार
2022 14 लाख 83 हजार
(जाने. – ऑक्टो.)

पुणे जिल्ह्यातील रक्तसंकलन (रक्तपिशव्या)
महिना   रक्तसंकलन
जानेवारी   20455
फेब्रुवारी   22565
मार्च        24806
एप्रिल     23742
मे           20204
जून        22030
जुलै        25859
ऑगस्ट    29219
सप्टेंबर      30870
ऑक्टोबर 21202

Back to top button