पुणे : तापमान वाढल्यामुळे थंडी गायब; राज्यात किमान तापमानात 2 ते 5 अंशांनी वाढ | पुढारी

पुणे : तापमान वाढल्यामुळे थंडी गायब; राज्यात किमान तापमानात 2 ते 5 अंशांनी वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील 98 टक्के भागातून कडाक्याची थंडी गायब झाली आहे. राज्यात किमान तापमान 2 ते 5 अंश, तर देशातील बहुतांश भागात 5 ते 13 अंशांनी वाढ झाल्याने हिवाळ्यात दिवसभर उकाडा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे वार्‍याचा वेग वाढून सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे हा फरक जाणवत आहे.

यंदा मान्सून परतीला पंधरा दिवस उशिरा गेल्याने थंडीलाही उशीर होईल, असा अंदाज होता. तसेच घडलेही. नोव्हेंबर महिन्यात फार कमी दिवस कडाक्याची थंडी जाणवली. मात्र किमान तापमानाचा पारा सतत 10 अंशाखाली फार कमी शहरात गेला होता. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, औरंगाबाद वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमान 12 अंशांच्या वरच राहिले.

डिसेंबरमध्ये थंडी पडेल, असा अंदाज होता. मात्र बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने वार्‍याचा वेग वाढला आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढला. त्याचा परिणाम दक्षिण भारतासह संपूर्ण देशात झाला. उत्तर भारताकडून येणारे पश्चिमी चक्रवातही यंदा कमी प्रमाणात सक्रिय झाले, त्यामुळे तिकडून येणारे थंड वारे येणे बंद झाले.

बाष्पयुक्त वारे येत असल्याचा परिणाम
बंगालच्या उपसागरात वारंवार वार्‍यांची चक्रीय स्थिती तयार होत असल्याने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, गुजरातपर्यंत बाष्पयुक्त वार्‍यांनी थंडीचा कडाका कमी केला आहे. तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताची तीव्रता कमी झाल्याने पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेशपर्यंत थंडीचा कडाका कमी झाला. या भागात किमान तापमान 16 ते 25 अंशांवर गेले आहे. महाराष्ट्रात नाशिक, औरंगाबाद, जळगाव वगळता किमान तापमान 14 ते 22 अंशांवर गेले आहे.

राज्यातील थंडीची शहरे (अंश सेल्सिअस)
नाशिक : 12.8
औरंगाबाद : 13.4
जळगाव : 13.2

देशातील थंडीची शहरे
श्रीनगर : उणे 1.9
सिमला : 7.5
वारणसी : दार्जिलिंग 7.8
ग्वाल्हेर : 8.7
मसुरी : 7.9
(बाकी सर्व भागात किमान तापमान 12 ते 25 अंशांवर)

बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती
काश्मीर व दक्षिण भारतात पाऊस
9 डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका कमी

Back to top button